You are currently viewing शंभोभारत

शंभोभारत

एक शापित राजहंस , बेदकार , बेजबाबदार राजपुत्र , छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व मातीत मिसळणारा वारसदार अशा एक ना अनेक कलंकांना पाणी पाजणारं रणझुंजवी महाकाव्य म्हणजे – शंभोभारत !
पराक्रमी पित्याच्या पोटी जन्मलेल्या महापराक्रमी मृत्युंजय वारसदाराची कहाणी म्हणजे – शंभोभारत !
तीनशे वर्षांच्या बदनामीच्या कडेकपार्यातून फेसाळणार्या पराक्रमाची गाथा म्हणजे – शंभोभारत !
अद्वितीय पराक्रम , दुर्दम्य दूरदृष्टी , अतुलनीय नियोजन , धगधगतं शौर्य यांचा अनोखा संगम म्हणजे- शंभोभारत !

किती लिहावं, बोलावं तरी शब्द कमी पडतील अशा महान , कर्तृत्ववान युगपुरुषावर तीनशे वर्ष इतिहासाने केलेला अन्याय पुसण्यासाठी उगारलेले ब्रम्हास्त्र म्हणजे शंभोभारत !
जवळपास तिनशे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तकं, नाटकं , कादंबर्या , चित्रपट इ. माध्यमातून होणारी बदनामी कैक वर्ष कैक पिढ्या बघत आल्या , वाचत आल्या , बदनाम होत राहिले माझे शंभुराजे ! रगेल आणि रंगेल प्रतिमा उभा करुन हिमालयालादेखील धडकी भरावी असा शंभुराजांचा पराक्रम , असे कर्तृत्व हेतुपरस्पर झाकले गेले ; पण ‘शंभोभारत – गाथा शिवपुत्राची’ या महाग्रंथातून छत्रपती शंभुराजांवर झालेल्या अन्यायावर कडकडीत आसूड ओढण्यात शिवकवी वैभव साळुंखे यशस्वी झाले आहेत.
ज्याला शंभुराजांच्या प्रेमात पडायचंय , ज्याला शंभुराजांवर जीव ओवाळून टाकायचाय त्याने एकदा ‘शंभोभारत’ वाचावंच ! सहज सोपी भाषा , बोलीभाषेतून काव्यमय शंभुराजा आपल्यासमोर उभे करण्याचं कसब शंभोभारत च्या माध्यमातून कवीराजांनी लिलया पेललं आहे. मागील दहा वर्षापासून इतिहासाच्या बाबतीत त्यातल्या त्यात शिवशंभु इतिहासाच्या बाबतीत आलेली जागरूकवस्था शंभोभारत च्या वाचनातून झळाळून निघेल !
शंभोभारत एकदा हातात घेतल्यानंतर मी किती वेळा वाचून काढलं याबाबत खरंच गिणती नाही केली ! आजही दररोज एकदातरी शंभोभारत हातात घेतल्याशिवाय एखादा श्लोक वाचल्याशिवाय झोप लागत नाही हे शिवविचारांचं व्यसन कवीराजांच्या लेखणीनं लावलं आहे.
कवीराज तळपलेल्या तलवारीचा , गाजवलेल्या मर्दुमकीचा , आदर्शवत आचरणाचा झाकोळलेला इतिहास आपण आपल्या शब्दज्वालांच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केलात त्याबद्दल मनापासून आभार !
आपली लेखनशैली अशीच बहरत जावो आणि शिवशंभुंच्या जाज्वल्य इतिहासाला आपल्या लेखणीद्वारे अशीच समिधा अर्पण होत राहो हीच जगदंबेचरणी प्रार्थना

Leave a Reply