माणसा माणसांत नवखेपण दिसतं
गावच्या मातीत पैशाचं पुढारलेपण दिसतं
माणूस माणसाला किंमत देईनासा झाला
राजाहो गाव’गाडा’ माणुसकीवीना पोरका झाला !
गाव ! फक्त नाव घेतलं तरी मनावरचं दडपण अलगद सरतं आणि चैतन्याचा बहर फुलुन वसंतातला प्रसन्नपणा चेहर्यावर खुलून येतो. गावची शुद्ध हवा , प्रवाहात वाहणाऱ्या नदीचं गोड पाणी , सकाळ सांजवातीला घुमघुमणारा मृदगंध , रांगडी माणसं प्रेमळ आज्या किती बोलावं किती लिहावं गावाबद्दल ! गावाबाहेर पडलेल्या प्रत्येकाच्या मनात आपापल्या गावाबद्दल एक हळवा कोपरा असतोच ; पण आजच्या या धकाधकीच्या जगात गावानं आपलं गावपण जपलंय का ? गावातल्या माणसांनी ग्रामीण माणुसकी जपलीय का ? सिमेंटच्या जंगलात वावरताना विखारी विचार घेऊन जगणाऱ्या माणूस नावाच्या प्राण्यानं नाती , प्रेम , आपुलकी याचा बळी तर दिला नाही ना ; या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या कथांच्या स्वरुपात व्यक्तीचरित्रात्मक घटनातून मांडण्याचा सर्वोत्कृष्ट प्रयोग केला आहे लेखक अक्षय टेमकर यांनी त्यांच्या ‘गाडा’ या कथासंग्रहात !
गाडा- गावकुसातल्या माणसांच्या गोष्टी, ज्या आजकालच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी आयुष्यात माणसांच्या गुणधर्माचा पाढा वाचकांच्या पुढं वाचतात. लेखक अक्षय टेमकरांनी गाडा कथासंग्रहात गावातील माणसांचं चरित्रात्मक वर्णन कथेच्या रुपात मांडताना लोप पावत चाललेल्या मानवी मूल्यांची आठवण करुन दिली आहे. या कथासंग्रहातील हर एक कथा केवळ एका व्यक्तीबद्दल सांगत नाही तर त्या व्यक्तीच्या आसपास असणारं वातावरण ,त्या वातावरणातील माणसांची ‘गुलाल तिकडं चांगभलं’ ही वृत्ती , माणूस म्हणून जगताना माणसांचं माणसांकडं होणारं दुर्लक्ष , काळानुसार बदलत जाणाऱ्या पिढीचा दृष्टिकोन , त्यात होरपळणारी माणुसकी इ. गोष्टींचा आरसा वाचकांसमोर उभा करते.
गाडा उलगडताना किंबहुना माणसांची नितीमत्ता उलगडून सांगणार्या चित्तरकथा बघताना प्रत्येक वाचक कथेनुसार अंतर्मुख होत जातो. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांची मांदियाळीच लेखकाने सर्व कथारुपात मांडली आहे. आपण राहिलेल्या , जगलेल्या मातीतील माणूसरुपी गोळ्यांना स्वतःच्या निरीक्षणातून त्या व्यक्तीत्वांच्या चांगल्या वाईट गुणासह कथारुपी मांडून खरा गाडा तर लेखकाने दामटला आहे. माणूस उलगडून सांगणार्या प्रत्येक कथेत असणारा नायक/नायिका वाचकांच्या देखील आयुष्यात कुठं ना कुठं नक्कीच सापडतात. संवेदना जागृक असणाऱ्या व्यक्तीनं संवेदना आणि मानवी भावभावना यांना कळत नकळतपणे तिलांजली दिलेल्या व्यक्तीत्वांचा घेतलेला जिताजागता सारांश म्हणजे ‘गाडा’ ! गावकुसातल्या गावगाड्यातल्या दैनंदिन आयुष्यात मानसिक, आर्थिक, सामाजिक बदलांचा तिथल्या साध्यासुध्या , आडग्या , भोळ्याभाबड्या, चालू, स्वभाव जपणार्या माणसांची बोलकी कहाणी म्हणजे ‘गाडा’ !
रोजंदारीनं पोट भरणाऱ्या बाळूला सासर्याच्या जमिनीचं एमआयडीसी कडून मिळालेलं घबाड हाती लागूनही चुकीच्या सवयीनं आणि पैशाच्या अपव्ययानं बाळूच्या हातात नियतीनं पुन्हा वरवंटाच दिला. आजच्या काळातही प्रत्येक गावात किमान आठ-दहा बाळू सापडतील. कथेतला बाळू प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सर्व गुंठामंत्र्यांना लागू पडतो.
दोन पोरात वाटणी झालेला मुंजाबा जगण्याच्या रहाटगाड्यात असा अडकतो की ‘सव्वा लाखाची मुठ झाकत’ आत्महत्या करावी लागते. आळशीपणा आणि ऐतखाऊपणात पन्नाशी गाठलेल्या जालिंदर जरकडला कौटुंबिक घटनेतून मिळालेला धडा त्याचं आयुष्य कसं मार्गी लावतो याची गोष्ट ‘पळून गेलेल्या मुलीचा बाप’ ही कथा सांगते. रावसाहेबा सारखे बेरकी बेने एखाद्याचा बाजार करायला कसे टपून असतात याची यथोचित मांडणी लेखकाने या कथेत केली आहे.
बापू बेल्हेकराच्या मनाची अगतिकता आणि परिस्थितीपुढं नमताना होणारी मानवी मनाची घालमेल ‘डाळभात लोणचं , कोण न्हाय कोणचं’ या कथेतून वाचकांसमोर येते. कथासंग्रहाच्या नावाचीच असणारी कथा रक्ताच्या गाडामालकाची आपल्या परंपरेविषयी, आपल्या नादाविषयी असणारा मरणासन्न जिव्हाळा उलगडून सांगतो. सत्तरीचा तुकाराम म्हातारा बैलगाडा शर्यतीसाठी काय जीवतोड मेहनत करतो आणि हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास पोटच्या पोराच्या बिनडोकपणानं कसा दुसर्याच्या वाट्याला जातो अन् त्यातूनही बाजी हरलेला असतानाही तुकाराम म्हातार्यानं बारीच्या विजयाचा गुलाल माथी कसा लावून घेतला याचा चित्तथरारक उलगडा म्हणजे ‘गाडा’ ही कथा !
डोळसपणे विचार करणार्या शुभमला गावातील स्वार्थी राजकारणी आणि अविचारी गावकर्यांनी दिलेल्या त्रासातूनच भविष्यातील ‘कलेक्टर शुभमचा’ जन्म कसा होतो याची कहाणी आपल्याला ‘देव दगडात की माणसात’ या कथेत वाचायला मिळते. आर्थिक दारिद्रयानं पिचलेल्या रामश्याला अस्मानी आणि सुलतानी संकटातून पुढं जाताना कराव्या लागलेल्या प्रवासाची गोष्ट ‘घुंगरू’ या कथेतून वाचकांना खिळवून ठेवते. रामश्याचा रामशेठ आणि तिथून उल्टा प्रवास करुनही बदलेला दृष्टिकोन वाचकांना खूपकाही शिकवून जातो. माणूस म्हणून जगताना समाजानं अलिखीतपणे आखून दिलेला मार्ग वैचारिक पातळीवर भेदताना , ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारावर उघड भुमीका मांडल्यानं लग्नच करणार नाही या निर्णयाप्रत जाताना गोवर्धन चासकराची मांडणी लेखकाने उत्तमरित्या आखली आहे. कष्टकरी शिवा ठकराच्या कथेत अचानक आलेला चढ उतार लेखकाच्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. ग्रामीण भागात राजकारणाशिवाय श्वास घेतला जात नाही म्हणतात याचीच प्रचिती ‘चुलीत गेली आमदारकी’ ही कथा पुन्हा एकदा निदर्शनास आणून देते. मानवी मनाच्या चंचलपणाची भिरभिरत्या विचारांची पुर्ण अपूर्णत्वाची कहाणी सत्तरी ओलांडलेला पांडबा त्याच्या कथेतून सांगून जखतो. एक चुकीचं पाऊल स्त्रीच्या जीवनाला नरकात टाकण्यासाठी पुरेसं असतं याचा पुरावाच येड्या संगीची कथा वाचकांना देते. घडायला अन् बिघडायला देखील एक प्रसंग पुरेसा असतो हे ‘सरपंचाचं कार्टं’ कथेतून प्रताप सांगून जातो तर राजकारण्याच्या लेखी सर्वसामान्यांची काडीची हैसियत ‘आमदारकीचा डमी उमेदवार’ असणारा नामदेव ढमाले स्वतःच्या कथेतून अनुभवतो.
हा कथासंग्रह १४ कथांच्या माध्यमातून मानवी जीवनातील शेकडो पैलू नजाकतीनं अधोरेखित करतो. लेखक अक्षय टेमकरांनी प्रत्येक कथेला दिलेला दर्जा वाचकांच्या मनावर सणसणीत चपराक देतो . वास्तवातली मांडणी करताना ना कुठं अतिशयोक्ती ना कुठं कमतरता हे आव्हान लेखकाने समर्थपणे पेललं आहे. पुलं नी ‘व्यक्ती आणि वल्ली’ च्या माध्यमातून वाचवर्गापुढं जी अजरामर पात्रं उभी केली त्यातून वाचकांच्या चेहर्यावर मिश्कील हास्य आलं तर गाडा वाचताना प्रत्येक वाचक कथासंग्रह जसा जसा पुढं सरकतो तसा वाचक आपापल्या अंतर्मनात खोलवर डोकावून बघतो. ग्रामीण बोलीभाषेतून ग्रामीण व्यक्तीचरित्रांना दिलेला यथार्थ न्याय लेखक अक्षय टेमकरांना नव्या पठडीतील ग्रामीण कथाकाराच्या आघाडीच्या फळीत बसवतो.
प्रत्येक गावकर्याने आणि शहरीपण जपणार्या शहरी माणसानं गाव जगण्यासाठी गाव समजून घेण्यासाठी या ‘गाडा’ ची सफर नक्कीच करावी.