You are currently viewing मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध

मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध

मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध

लेखक- डॉ.जयसिंगराव पवार

शिवशाही किंवा मराठ्यांच्या इतिहासाची अलिखित गोडी म्हणा किंवा इतिहास वाचनाची भूक म्हणा पहिल्यापासूनच जास्त आहे. इयत्ता ४ थीच्या इतिहास पुस्तकापासून लागलेलं शिवछत्रपतींच्या वाचनाचं वेड असंख्य ऐतिहासिक पुस्तके वाचण्यात परावर्तित झालं . जसंजसं वय वाढत गेलं तशी इतिहास वाचनाची आवड देखील चिकित्सक होत गेली. मा. वा.सी.बेद्रे यांच्या इतिहास संशोधनातून त्यांची ग्रंथसंपदा अधिकच मार्गदर्शक ठरली.
१६३० महाराष्ट्राच्या चालत्या बोलत्या खानदानाच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म होतो काय , सहाशे वर्षांपेक्षा जास्त गुलामगिरीत असणारा महाराष्ट्रात नव मांगल्याची पहाट होते काय, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजेंच्या संकल्पनेतून मॉंसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली मराठा साम्राज्य उभा राहते काय , छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वातून बारा मावळातून असंख्य मावळे ज्वलंत राष्ट्रभावनेतून जागरुक होऊन स्वराज्याच्या धगधगत्या अग्नीकुंडात समिधा बनून आहुती देतात ती नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी तर माझा देव-देश-धर्म,माझी जनता सुखा समाधानानं राहून स्वराज्य- स्वातंत्र्य अनुभवावी या उदात्त हेतूने शिवशाहीचा सुवर्णकाळ लखाखतो !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने स्वराज्य स्थापनेचा सुवर्णकाळ अनुभवला , शुन्यातून सुरुवात करुन जगभरातील इतिहासकारांना दखल घ्यायला भाग पाडणार्या दैदिप्यमान स्वराज्याचा गाडा डौलाने चालत होता पण अचानक नजर लागावी त्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्य पोरकं झालं , पण म्हणतात ना कार्यकर्तृत्वाचा वारसा हा एका पिढीतून दुसर्या पिढीत आपोआप जातो त्याप्रमाणेच थोरल्या महाराजानंतर एका वादळाच्या हाती स्वराज्याची कमान आली , एक कुटुंबप्रमुख , एक राज्यकर्ता , एक पालक म्हणून रयतेचा सांभाळ करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांनी अलौकिक कारकिर्दीने स्वराज्याला सर्वोच्च स्थानी पोचवलं , महाराजानंतर स्वराज्य तेवढ्याच ताकदीनं सांभाळलं , वाढवलं ! पण अवघ्या काही वर्षातच महाराष्ट्राला पुन्हा ग्रहण लागलं छत्रपती संभाजीराजांचा फितुरांनी घात केला आणि औरंगजेबाने महाराजांना कैद करुन अनन्वित छळ करत मृत्युलाही लाजवेल अशा दुर्दैवी पद्धतीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा खून केला, शंभुराजांच्या वादळी कारकिर्दीत इतिहासाच्या पानापानांना अमरत्व बहाल केलं .

छत्रपती संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या अंतापर्यंतच्या धगधगत्या अग्नीकुंडाची पुराव्यानिशी केलेली उकल म्हणजे डॉ.जयसिंगराव पवारांचं #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध’ हे पुस्तक !

शंभुराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात माजलेली अनागोंदी मोडीत काढत महाराणी येसूबाई बाईसाहेबांनी अमोल त्याग करत स्वराज्याचा अमृतकलश राजाराम महाराजांच्या हाती सोपवला , त्यावेळी झालेली ‘मराठ्यांची मसलत’ लेखकाने पुराव्यानिशी मांडली आहे. सुर्याजी पिसाळाची अतुलनीय अशी गद्दारी रायगडाने अनुभवली , लेखकाने हा प्रसंग जिताजागता उभा केला आहे. सुर्याजी पिसाळाची पुराव्यानिशी चिकीत्सा यापूर्वी निश्चीतच कधी झाली नसेल .
राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास , रायगडाने दिलेली लढत , महाराणी येसुबाई साहेबांची निर्णयक्षमता , स्वराज्यापुढे वैयक्तिक भावभावनेला दिलेली मूठमाती , बाळ शाहूराजांसह औरंगजेबाच्या कैदेतील काळ , जिवंत उभा केला आहे लेखकाने. अरजोजी गिरजोजी यादवांचा खटला , नागोजी मानेंचा स्वार्थीपणा , धनाजी संताजीच्या सुवर्णीय कारकिर्दीची वाटचाल , राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील पडद्याआड राहिलेल्या अमूल्य घटना ,राजकारण सारं काही डोळ्यासमोर घडतंय याचीच अनुभूती लेखकाच्या प्रत्येक वाक्यातून होते. संताजी धनाजींचा वाद , त्यातून स्वार्थी लोकांनी साधलेली वेळ, संताजी आणि राजाराम महाराज यांच्यात आलेले वितुष्ट त्यातूनच राजाराम महाराजाविरुद्ध संताजीने लढलेले युद्ध त्यातील महाराजांचा झालेला पराभव आणि त्यानंतर संताजीची झालेली मनस्थिती तसेच संताजी घोरपड्यांचा दुर्दैवी खून यावर लेखकाने केलेला उहापोह मनाला चटका लावून जातो. जिंजीला सात वर्षे दिलेला झुल्फिकारखानाचा वेढा त्यातून सुटून राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात केलेला प्रवास आणि सिंहगडावर झालेल्या राजाराम महाराजांच्या अकस्मात मृत्यूनंतर राजा कर्णाच्या कहानीचा केलेला उहापोह वाचकांना नवी दृष्टी देतो. राजारामपुत्र द्वितीय शिवाजीराजे यांना गादीवर बसवून महाराणी ताराबाईसाहेबांचं राजकारण, धगधगती कर्तृत्व शैली , याचकाळात उफाळून आलेल्या तोतया शाहूराजांचा बिमोड , थोरल्या शाहूराजांची सुटका, त्यानंतर झालेली मराठा गादींची शकलं , या घटना पुराव्यानिशी लेखकाने मांडून त्यावेळची महाराष्ट्राची परिस्थिती जिवंत करून दाखवली. भद्रकाली ताराराणींच्या कारकीर्दीत स्वराज्याला मिळालेली नवसंजीवनी प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयात मशाल पेटवून गेली आणि उभ्या महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना नडणार्या औरंग्याला इथंच कबर खोदावी लागली. शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या स्वराज्याला राजारामकाळात नर्मदेच्या पार पोचवण्यात आणि ताराराणी काळात तापीपार पोचवण्यात मराठा मावळ्यांना यश आले होते. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध केवळ साम्राज्य वृद्धीसाठी नव्हते तर दीर्घकाळ चाललेली ती एक अस्मितेची लढाई होती. शिवशाही किंवा मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीएवढाच नाही तर त्यानंतरच्या इतिहासाची पुराव्यानिशी सांगोपांग चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून होते आणि इतिहास वाचकांना पुढच्या घडामोडींची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून होते.

Leave a Reply