You are currently viewing मनाच्या कोपर्यातून मेंदूच्या कार्यक्षमतेपर्यंत भावभावनांचा खेळ समजून सांगणारं ‘इमोशनल हायजॅक’ !

मनाच्या कोपर्यातून मेंदूच्या कार्यक्षमतेपर्यंत भावभावनांचा खेळ समजून सांगणारं ‘इमोशनल हायजॅक’ !

इमोशन – भावना म्हणजे नेमकं काय ? आपल्या मनात/ डोक्यात येणारा प्रत्येक विचार भावनाच असते का ? आपल्या दैनंदिन जिवनात भावनेचं महत्त्व किती ? भावना नेमक्या तयार कशा होतात ? प्रत्येक भावनेला / इमोशनला हाताळायचं कसं ? असे असंख्य प्रश्न आहेत जे प्रत्येकाच्या मनात एकदा का असेना तयार होतात . या प्रश्नांचं उत्तर ‘इमोशनल हायजॅक’ या पुस्तकात नव्हे तर महाग्रंथात मिळेल.
हायजॅक म्हटलं की आपल्यासमोर पिक्चर किंवा इ. मनोरंजनात्मक साधनामध्ये बघितलेला प्रसंग उभा राहतो ; पण या पुस्तकाने (खरं तर पुस्तक म्हणनं चुकीचंच आहे कारण एखादा मित्र मार्गदर्शक किंवा सल्लागार जेवढ्या चांगल्या प्रकारे काऊन्सिलिंग करु शकतो त्याच्या हजार पटीने हा बोलता न येणारा मार्गदर्शक काम करतो.) मी सर्वांसोबत चांगला वागूनही माझ्याच बाबतीत असं का घडतं ? नेहमी मलाच त्रास का होतो असे शेकडो प्रश्न प्रत्येक जिवंत मानसाच्या मनात एकदातरी येतातच.
लेखक मनोज अंबिके सर यांनी त्यांच्या या मार्गदर्शक कलाकृतीत
(किंवा वेबसिरीज म्हणूया) पंधरा एपिसोड दिग्दर्शकाने मांडले आहेत.
इमोशनल हायजॅक होणं म्हणजे काय ? भावनेच्या उगमापासून , भावनेची शक्ती, भावनेच्या शक्तीचा नेमका वापर कसा करायचा इ. बाबतीत सखोल असा उहापोह केलेला आहे. भावनिक असताना आपली देहबोली नेमकी कशी रिएक्ट करते , भावनिक जग आणि वास्तविक जग कोणतं , या एपिसोडमधून आपली आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे बघायचा एक नवीनच दृष्टिकोन तयार होतो.
स्वसंवाद म्हणजे काय ? याची नव्याने ओळख लेखक आपल्याला करुन देतो. आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम स्वतःने स्वतःशी केलेला संवाद करतो. आपल्या एकूण संवादापैकी 90% संवाद आपण स्वतःशीच साधतो आणि केवळ 10% संवाद आपण इतराशी करतो हे वाक्य स्वसंवादाचं महत्व आणि कार्य अधोरेखित करते. स्वसंवादाच्या माध्यमातूनच लेखकाने सांगितलेली ‘थांबा-समजून घ्या-प्रतिसाद द्या’ ही थेअरी तार्किक दृष्ट्या यशस्वी ठरते. एखादी घटना घडे त्यावर आपण स्वतःशी काय संवाद करतो यावर आपली क्रिया किंवा प्रतिक्रिया अवलंबून असते. स्वसंवाद आपल्या दैनंदिन आयुष्यात किती परिणामकारक भावनिक रित्या जागृक करण्यासाठी आवश्यक आहे हे समर्पक उदाहरणाच्या माध्यमातून लेखकाने पटवून दिलं आहे.
या पुस्तकाचा मूळ गाभा म्हणता येईल असा एपिसोड म्हणजे स्वसंवाद ! आपल्या भावनांचे / इमोशन्सचे हायजॅकर कोण आहे , आपल्या विचारांवर आपण प्रत्येक व्यक्ती प्रसंग इ.ना आपल्याला वाटेल ते लेबल लावून , तुलना करुन किंवा अंदाज बांधून एका काल्पनिक दुनियेत प्रवेश करुन आपण मोकळे होतो हेच आपल्या इमोशनल हायजॅक होण्याचं कारण आहे याची प्रचिती प्रत्येक वाक्यातून येते.
भावनांचे प्रकार , उपयोग , तसेच संवाद कौशल्यात भावनांचं महत्व तसेच सुयोग्य संवादासाठीच्या तीन यशस्वी पायर्या यामाध्यमातून वाचकाने भावनिक न होता योग्य प्रतिसाद कसा दिला पाहिजे हे शिकवून जातात.
हे पुस्तक म्हणजे भावनिक होणं आणि त्यातून योग्य रिजल्ट किंवा परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी केल्या जाणाऱ्या विचारपद्धतीचं संविधान आहे असं म्हणता येईल. दररोजच्या आयुष्यातील साधे उदाहरणं देत लेखकाने केलेली मांडणी कुठेही वाचकांना एकांगी पाडत नाही. व्यक्तीमत्व विकास किंवा इमोशनल इंटिलिजन्स कसा वाढवायचा / प्रत्येक गोष्टीकडे समर्पक कसं बघायचं याचा नवदृष्टीकोन हे पुस्तक देतं . प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यामधील नेमका फरक काय आहे आणि भावनांवर नियंत्रण ठेऊन त्याचा सुयोग्य वापर करण्याची नेमकी विचारपद्धती कशी डेव्हलप करायची यासाठी हे पुस्तक भाष्य करते.
कोव्हीडच्या काळात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गुंत्यात अडकला आहे , या वाढत जाणाऱ्या गुंत्यामुळे शेकडो लोकांनी आपले जीवन संपवलं आहे , ज्यांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटामुळे आपलं आयुष्य संपवलं आहे किंवा हिंमत हरुन बसले आहेत त्यांच्या साठी हे पुस्तक नक्कीच नवसंजीवनी ठरलं असतं . ज्यांना खरंच असं वाटतं की आपलं सर्वकाही संपलंय त्यांनी हे पुस्तक नक्कीच एकदातरी मन लावून वाचा. प्रेरणादायी कथा किंवा भाषणं ऐकण्यापेक्षा येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची हिंमत हे पुस्तक नक्कीच तयार करेल. भावनिक आणि वास्तविक जगाची ओळख करुन देणारं, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांना दिशा देणारं मराठी भाषेतील सर्वोत्तम हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे.
या सर्वोत्तम लिखाण कार्यासाठी लेखक मनोज अंबिके सरांचे मनापासून आभार !

Leave a Reply