You are currently viewing जगण्याचं तत्वज्ञान हलक्या फुलक्या शब्दांत मांडलेलं आयुष्याचं सुमधुर गाणं – वपुर्झा

जगण्याचं तत्वज्ञान हलक्या फुलक्या शब्दांत मांडलेलं आयुष्याचं सुमधुर गाणं – वपुर्झा

वपु ! महाराष्ट्राच्या मातीतील शब्दहिर्यांची खाण बाळगणारा शब्दकुबेरच जणू ! ज्यांचा प्रत्येक शब्द न शब्दांत एक खोल अर्थ आणि व्याप्ती दडलेली असते असे सरस्वतीचे मानसपुत्र म्हणजे वपु . वपुंचं नाव आणि त्यांच्या साहित्यातील किमान हजारो शब्द सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने वाचलेलेच असतात. लेखक,कथाकथनकार,आर्किटेक्ट, व्हायोलिन-हार्मोनियम वादक, उत्तम फोटोग्राफर , सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे तसेच सुंदर इमारत, सुंदर सजावट, आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते ! या वैविध्यपूर्ण गुणांचा अर्क वपुंच्या लिखाणात न उतरला तर नवलच . वपुंच्या कथा म्हणजे मानवी मनाचे कंगोरे भावनेच्या आणि वास्तवतेच्या सर्वोच्च शिखरावरुन सत्यतेची किनार असलेलं देखणं मनमोहक प्रेक्षणीय स्थळ. खरं तर वपुंच्या कथा या फक्त कथा नाहीतच तर एखाद्या व्यक्ती किंवा समाजमनाच्या आचार विचार पद्धतीचा एक साचेबद्ध पॅटर्न आहे. वपुंनी आपल्या लिखाणातून फक्त कथा नाही तर चालत्या बोलत्या माणसांचे पॅटर्न्स उभे केले आहेत.

आता वपुंच्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी एक अशा ‘वपुर्झा’ बद्दल बोलायचं तर हे केवळ एक पुस्तक नाही, किंवा फक्त लिखाण नाही तर शब्दाशब्दामधून डोकावणारा मानवी स्थायी स्वभाव आहे. आणि हा स्वभाव आपले अंतरंग प्रत्येक पानावर उघडून दाखवतो. कुठलंही पान उघडावं आणि त्या शब्दांनी वाचकांच्या मनावर गारुड घालावं अशी वपुर्झाची ताकद आहे. अनुक्रमणिका , संदर्भ इ. फॉर्मेलिटी नसलेला एक अप्रतिम असा मानवी मनाचा खोल स्थायीभाव सांगणारा आपल्या आतला आवाज म्हणजे ‘वपुर्झा’ !
वेणुताई चव्हाण स्वर्गवासी झाल्यानंतर स्व.यशवंतराव चव्हाणांचा हळवाभाव सांगणारा उतारा या दोन महान व्यक्तीमत्वांच्या महानतेचं गमक उलगडून सांगतो. रिटायर होणाऱ्या म्हातार्या माणसाचं दुःख सांगताना लेखक त्याची दुखरी नस अलगद पकडतात. ‘पुरुषार्थ म्हणजे रसिकता’ अशी सहजसोपी व्याख्या सांगताना लेखक वाचकांना वेगळ्याच तत्वज्ञान जगात घेऊन जातात. एखादा उतारा कलाकाराची मनस्थिती सांगतो तर पुढचा उतारा स्रीवर्गाविषयी भावना मांडतो तर पुढील उतारा तारुण्यावर भाष्य करतो, तर पुढच्याच उतार्यात वार्धक्य आणि मृत्यू असे क्षण हळवेपणाने समोर येतात. मानवी जीवनात जे काही घडतं असतं ते सर्व काही वपुर्झा मध्ये लेखकानं शब्दबध्द केलं आहे.

जन्म, संस्कार, जडणघडण , पालकत्व, बालपण, तारुण्य, नात्यातला हळवेपणा , कर्तृत्वाधिष्ठीत जबाबदाऱ्या , आर्थिक बाजू , मानसिक संतुलन , असे एक ना अनेक शेकडो हजारो विषयांना कधी विनोदी तर कधी उपरोधिक , कधी हसव्या तर कधी भावनिक शब्दांत गुंफणारा शब्दमाळी म्हणजे वपु. मानवी जीवनातील अशी एकही भावना नसेल ज्याचा उल्लेख वपुर्झा मध्ये नाही ; याचा अर्थ असा नाही की वपुर्झा म्हणजे भावनांचं कोठार आहे , उलट हे पुस्तक प्रत्येक भावभावनेशी सामोरं जाताना मानवी मनाची स्थिरता कायम ठेवून मार्गक्रमण करण्यासाठी उपयुक्त असा वाटाड्या आहे.
वाचन करणाऱ्या प्रत्येक शब्दप्रेमी वाचनवेड्यासाठी वपुर्झा एक कधीही न संपणारी मेजवानी आहे. धन्यवाद वपु अशी अप्रतिम अद्वितीय अशी कलाकृती शब्दप्रेमी वाचकांच्या पुढ्यात मांडलीत .

Leave a Reply