व्यवसाय म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं ? चकचकीत केबिन्स , एसी रुम्स की मळकटलेल्या भिंतीत काम कर्णकर्कश्श आवाजाच्या मशीनवर काम करणारे कामगार ? नव्या कोर्या करकरीत गाडीतून राजबिंड्या व्यक्तीत्वासह उंची कपडे परिधान केलेले बिजनेसमन की व्यवसाय वाढीसाठी उन्हातान्हात दुचाकीवर धावपळ करणारे स्वयंरोजगार सांभाळणारे वय लिंग याची मर्यादा नसलेले तरुण ? व्यवसायिकाची नेमकी व्याख्या काय ? व्यावसायिक होण्यासाठी पात्रता काय ? या सर्व प्रश्नांची व्यावसायिक मानसिकतेतून उत्तरे देणारा व्यावसायिक मार्गदर्शक म्हणजे मनोज अंबिके सर लिखित ‘उद्योजक की यशस्वी उद्योजक’ हा मित्र !
लहान व्यावसायिक , मॅनेजर्स , ते कंपनीच्या सीईओ पर्यंत सर्वांना मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणारे पुस्तक म्हणजे उद्योजक ते यशस्वी उद्योजक ! या पुस्तकात २९ मुद्द्यांच्या आधारे व्यावसायिक मानसिकता अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितली आहे. उद्योग व्यवसाय म्हटलं की आजही मराठी माणूस उदासीनच असतो. कुटुंब , नातेवाईक , समाज हे सर्वजण प्रोत्साहन तर देतच नाहीत पण आपल्या मार्गात अडचणीच निर्माण करतात असाच अनुभव बहुतांशी मराठी व्यावसायिक तरुणांचा आहे . त्यामुळे मराठी टक्का व्यावसायिक क्षेत्रात अगदीच नगण्य आहे आणि समाज आणि आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम व्यावसायिकाच्या मानसिकतेवर पडतो. त्यामुळे व्यावसायिक पुढचं पाऊल टाकायलाच घाबरतो ; हे पुस्तक व्यावसायिकांना पुढचं पाऊल टाकायला प्रोत्साहित तर नक्कीच करणार आहे त्यासोबतच प्रत्येक पावलावर व्यावसायिक म्हणून आपण कशी विचारधारा अवलंबिली पाहिजे याचा रोडमॅपच लेखकाने पुस्तकातून सांगितला आहे.
प्रोफेशनलीझम सांभाळताना अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देऊन व्यवसायाप्रती असणारी बांधिलकी थोड्याशा साहसाच्या आधारे वाढवून आपल्या व्यवसायात मालक म्हणून न वागता ट्रस्टीज सारखे राहून व्यवसायवृद्धीचा फॉर्म्युला सांगितलख आहे. बुद्धीबळातील पटाच्या ६४ घरांचा दाखला देत व्यावसायिकाने केबिन प्रेम कमी करुन चालक आणि मालक म्हणून व्यवसायाच्या वृद्धीसाठी निर्णय घेत व्यवसाय नेमका करतो कशासाठी याचा शोध घेतला पाहिजे. पुराणातील वांगी पुराणात हे तत्व न ठेवता रामायणातील हनुमानाच्या लंकादहनाचा प्रसंग व्यावसायिक यशासाठी सांगताना लेखकाने व्यवसायातील की एरिया-पर्सन-प्रोडक्ट यांची सुयोग्य सांगड कशी घालायची याबाबत मार्गदर्शन केले आहे.
लहानात लहान ध्येय ठेवत व्यवसायाच्या दैनंदिन वाटचालीत ब्रेक इव्हन मेंटेन करत असतानाच प्रोडक्टीव्ह प्रोडक्टची निवड कशी करायची त्याबाबत व्यवसायिकाने सजग का असलं पाहिजे याबद्दल अंबिके सर उदाहरणासह मार्गदर्शन करतात. योग्य जागी योग्य माणसाची निवड करुन व्यवसायातील बॉटल नेकवर कशा प्रकारे मात करता येते हे वाचकांना पटवून देण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत.
प्रत्येक धड्यातून लेखकाने व्यावसायिकाला मानसिकरित्या कणखर बनवण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. आपल्या व्यवसायाचं व्हिजन मिशन ठरवताना आपली स्वतःची ब्रँड इमेज जपत परिपूर्ण ऍक्शन प्लॅन कसा अवलंबावा याबद्दल लेखक दिशा दाखवतात. कुठल्याही व्यवसायाच्या यशासाठी तुमची सहकारी टीम हीच तुमची संपत्ती असते त्यामुळे सहकार्यांना गरजेनुसार ट्रेन करुन व्यवसाय वृद्धी करण्याचा राजमार्ग लेखकाने सांगितला आहे. व्यवसाय करताना एक एक रुपयाचा हिशोब व्यवसायाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. बुद्धीमान माश्यांचं दिलेलं उदाहरण आजच्या कोरोना काळानंतरच्या व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी चपखल बसते. व्यावसायिक म्हटलं की कमिटमेंट आलीच त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाची व्यवसायाप्रती असणारी निष्ठा ही त्याने दिलेल्या आणि पूर्ण केलेल्या शब्दावरच ठरते.
एक शब्दही न बोलता व्यावसायिक म्हणून मी श्रेष्ठ कसा हे सांगण्यासाठी इथोज मार्गदर्शक ठरते त्यासाठी योग्य बोटीची निवड करुन पिंजर्यातल्या वाघाला योग्य संधी देण्याचं कसब बॉस म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने अंगिकारले पाहिजे. व्यवसाय करताना स्वतःसोबतच इतरांचाही विकास साधला जावा हे संघटित शक्तीचं प्रतिक व्यावसायिक कल्चरनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरते. वेळेच्या व्यवस्थापना बरोबरच प्रोडक्टीव्हीटी वाढवण्याचं गमक लेखकाने उलगडून सांगितले आहे. फक्त व्यावसायिकच नाही तर कार्यक्षम मॅनेजर बनण्यासाठीचा उत्कृष्ट दिशादर्शक म्हणून या पुस्तकाकडे बघितलं पाहिजे.
व्यवसाय करताना ठरावीक काळानंतर व्यावसायिक यशस्वी ठरतो आणि यश मिळाल्यानंतर व्यावसायिकाने ते यश टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल लेखक सखोल विचार मांडतात.
व्यावसायिक म्हणून जगताना असामान्य यश मिळवण्यासाठी , कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी हे पुस्तक सर्वोत्तम मित्र,मार्गदर्शक आणि तत्वज्ञ यांचा रोल निभावते. सहज सोपी भाषा आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे याद्वारे लेखकाने त्यांच्याच ‘टेक फ्लाईट’ या ट्रेनिंग सेशन मधील माहिती आणि मार्गदर्शनावर आधारित ‘टेक फ्लाईट’ या पुस्तकाची पुढची आवृत्ती ‘उद्योजक की यशस्वी उद्योजक ‘ या पुस्तकाद्वारे वाचकांना दिली आहे.
लेखक मनोज अंबिके हे ज्येष्ठ व्यावसायिक मार्गदर्शक असल्याने त्यांच्या दीर्घ मार्गदर्शनपर करिअरमधील आलेले अनुभव व्यावसायिकांना खूप मार्गदर्शक ठरतात.