मानवी मुल्यांच्या स्थिरतेला आव्हान देणारा भक्तीमय हल्लकल्लोळ – कोप
आयुष्य एकदम लयीत चालावं , आयुष्याची गाडी रुळावर धावतेय असं वाटावं , स्थिरतेच्या सर्वोच्च स्थानी आपण पोचलोय ही भावना तग धरुन बसावी आणि तेवढ्यात आयुष्याचा ‘श्रीकांत’ व्हावा अन् मनाच्या प्रत्येक कोपर्यातून भक्तीचा अथांग सागर वाहत असतानाही आपल्या आराध्य दैवतालाच दरदिवशी आव्हान द्यावं यासारखं अस्थिरत्व नाही !
प्रथितयश लेखक नितीन थोरात यांनी त्यांच्या ‘कोप’ या कलाकृतीतून मानवी भावभावनांची अशी काही सरमिसळ वाचकांच्या पुढ्यात मांडून ठेवली की वाचणारा दर वाक्यानिशी अनंत भावनांचा अनुभव घेत राहतो. ‘मांढरदेवी दुर्घटना’ आठवली की आई काळुबाई च्या शिरपेचात संमिश्र प्रतिक्रियांची भळभळणारी जखम दिसून येते. २००५ साली घडलेल्या या दुर्दैवी घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो कुटुंबं दुभंगली गेली , हजारो नाती शेकडोंच्या पायात तुडविली गेली त्यापैकीच एक म्हणजे काळुबाईचा निस्सीम भक्त आपल्या कथेचा जिताजागता नायक श्रीकांत !
काळुबाईला मानणारं अख्खं कुटुंब पिढीजात काळुबाईचं वारं वाहत आहे. वाट्याला येणारा प्रत्येक घास काळुबाईच्या आशीर्वादानेच आपल्या वाट्याला आला आहे त्यामुळे दैनंदिन जीवनात आईशिवाय एक क्षणही दुरापास्त आहे कुटुंबाचा. ग्रामीण भागातील दैवतांचा घरोघरी काय प्रभाव आहे, दैनंदिन जीवनदेखील कशा पद्धतीने प्रभावित होतं याचं सुरेख चित्रण लेखकाने केलं आहे. ज्योती आणि श्रीकांतचं फुलत जाणारं नातं वाचकांना मोहरुन टाकतं. मांढरदेवी यात्रेचा प्रसंग वाचताना अतिशय बारकाव्यानिशी केलेली वर्णने त्या ठिकाणचं जिवंत चित्र रेखाटतात. प्रत्येक घटना प्रसंग वाचताना जिवंतपणा अनुभवायला येतो, एखादं प्रवासवर्णन देखील फिकं पडेल एवढी सजीव मांडणी लेखकाने केली आहे.
कादंबरीत घाट चढतानाचा एक प्रसंग वर्णिलेला आहे जिथे गाडीचं नियंत्रण सुटून गाडी उलट्या दिशेने घाटाच्या उतारात जायला लागते त्यावेळी गाडीतील प्रत्येक माणसाच्या मनात आलेली भावना एवढी सजीव वाटते की अंगावर सर्रकन काटा येतो. आपल्या उघड्या डोळ्यांनी आईवडिलांचा मृत्यू पाहताना श्रीकांतची हतबलता वाचकांच्या मनाला कापत जाते. स्वतःच्या पोटच्या ज्या मुलीला काळुबाईचं प्रतिरूप मानून, तिचाच आशिर्वाद मानून, अख्खं कुटुंब जिच्यावरुन जीव ओवाळून टाकतं त्या उमलणार्या कळीला काळुबाईच्या दारातून चोळामोळा करुन आणताना श्रीकांतची घालमेल वाचताना आपसूकच वाचक स्वतः रडतो. कधी भूतकाळात तर कधी वर्तमानकाळात जगणारा श्रीकांत जेव्हा ‘काळुबाईच्या डोळ्यातून अश्रू आल्या शिवाय माझे अश्रू सुकणार नाहीत’ अशी आपल्या आराध्याचीच बदला घेणारी भक्ताची शपथ घेतो तेंव्हा कथेला वेगळंच वळण लागतं.
ज्योती आणि श्रीकांतला एका हळुवार नात्यात बांधणारा धागा श्रद्धा जेव्हा काळुबाईच्या दारात तिच्यातच सामावते तेव्हा पती पत्नीचं नातं केवळ नावापुरतंच उरतं. कादंबरी म्हणावं की श्रीकांतच्या जीवनाची धगधगती अग्नी गाथा म्हणावी हा प्रश्न कलाकृती जगताना पडतो.
‘कोप’ नेमका कोणाचा म्हणावा असा विचार आस्तिक आणि नास्तिक दोघांनाही छळल्याशिवाय राहणार नाही. काळुबाईचा कोप की मानवी स्वभावाच्या अतिरेकपणाचा कोप की एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाची सुरुवात कुठल्या शब्दांत या कलाकृतीला बांधता येईल हे ठरवण्यासाठी नक्की वाचा लेखक नितीन थोरात लिखीत रुद्र एंटरप्रायझेस प्रकाशित कादंबरी ‘कोप’ !
✍️ विजय गोपाळराव पवार