You are currently viewing CHAT GPT नावाचं वादळ

CHAT GPT नावाचं वादळ

जमाना टेक्नॉलॉजीचा आहे’ ‘तंत्रज्ञानाने जग काबीज केलं आहे’ असे आणि यासारखे अनेक संवाद आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आदिकाळापासून इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल मानवी जीवनाचा विकास हा गरजेनुसार प्रगत होत गेला आहे. चाकाचा शोध, आगीचा शोध हे मानवी जीवनाला सुखकर करण्यासाठी दिशा देणारे शोध ठरले. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गरज माणसाला एक नवीन शोध देऊन गेली असे म्हणता येईल.

या संपूर्ण सृष्टीत माणूस इतर सजीवांपेक्षा वेगळा ठरतो ते त्याच्या बुद्धीमत्तेमुळे ! प्रत्येक गरज जशी शोधाची जननी ठरली ती मुळात नैसर्गिक मिळणाऱ्या बुद्धिमत्तेला मानव निर्मित करण्याची पुढची पायरी म्हणूनच ! आकडेमोड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गणकयंत्र म्हणजेच कॅल्क्युलेटर पासून ते आजच्या काळात आपल्याला श्वासाइतकंच महत्वाचं बनलेल्या कॉम्प्युटर पर्यंत आपण प्रत्येक गोष्टीसाठी कृत्रिम किंवा मानवनिर्मित अविष्कारांवर अवलंबून आहोत. या अविष्कारातीलच पुढचा माहितीशोधाचा जादुई दिवा म्हणजे CHAT GPT !

माहिती विश्वात गुगलचं आगमन होऊन जवळपास दोन दशके उलटल्यानंतर chat GPT च्या रुपाने गुगलला पर्याय मिळाला आहे. प्रत्येक प्रश्नाचं हव्या त्या स्वरूपातील उत्तर घेऊन Chat GPT जादुई दिव्याप्रमाणे आपल्या सोबत उभा आहे.

GPT काम कसे करते ?

Chat bot स्वरुपातील प्रणालीच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा हा टप्पा अविष्काराहून कमी नाही. मानवी संवादातील लिखीत किंवा वाचिक बाबींचं अनुकरण करण्याचं महत्वपूर्ण कार्य chat bot करतं. GPT मुळे BOT हा शब्द प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला असला तरी २०१६ पासून मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून ही प्रणाली आपल्या ओळखीची आहे. Blender Bot ही Bot प्रणाली GPT एवढी लोकप्रियता नाही मिळवू शकली.
CHAT GPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून Google सारख्या शक्तीशाली शोधप्रणाली ला पर्याय म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे. हे
GPT म्हणजेच Generative Pretrained Transformer लॅंग्वेज मॉड्यूल आहे जे AI ने विकसित केले आहे.
GPT च्या सर्च बॉक्समध्ये सर्च केलेले शब्द GPT समजून घेऊन वेगवेगळे लेख,बातम्या,तक्ते इ. फॉरमॅटमध्ये उत्तर तर देतेच यासोबतच व्याकरणातील चुका देखील दुरुस्त करते.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर AI ने मानवी भाषा समजून घेऊन त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी, संभाषणात्मक संवाद साधण्यासाठी मशिन लर्निंगद्वारे GPT ला प्रशिक्षित करण्यात आले आहे.
GPT हे Deep Learning चा वापर करून मानवी भाषेसारखे लिखाण करण्यासाठी AI ने तयार केलेले लॅंग्वेज मॉड्यूल आहे. या अल्गोरिदमचा वापर करून कुठल्याही भाषेतील मजकुराला विविध शब्दांच्या उपलब्ध डेटा नुसार क्रम लावून विश्लेषण करत भाषांतर करणे आणि मूळ उत्तराच्या आसपासचे उत्तर तयार करणे हे GPT चे आऊटपुट ठरते.
१० लाख वापरकर्त्यांनी एका आठवड्यात GPT चा वापर करून या प्लॅटफॉर्म ला लोकप्रिय केले आहे. वर्ल्ड स्टॅटिस्टीक्सच्या रिपोर्ट नुसार NETFLIX ला हा टप्पा गाठण्यासाठी ३.५ वर्षे, फेसबुक आणि ट्विटरला १० महिने तर इन्स्टाग्रामला ३ महिने लागले होते.

उगमाचा इतिहास

सॅम ऑल्टमन आणि एलॉन मस्क यांनी २०१५ साली OPEN AI ची सुरुवात केली. मस्क यांनी Tesla कडे पुर्ण लक्ष देण्यासाठी CHAT GPT मधून काढता पाय घेतला ; आजही सल्लागार समिती वर ते स्थानापन्न आहेत. यानंतर मायक्रोसॉफ्टने यात गुंतवणूक केली. २०१८ साली GPT ला एक संशोधन म्हणून प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रोटोटाईप म्हणून लॉन्च करण्यात आले.

GPT चे फायदे –
-कोणत्याही प्रश्नाचे नेमके उत्तर मिळवण्यासाठी उपयोगी पडेल.
-लिखाण कामासाठी मार्गदर्शक ठरेल.
-कोणत्याही क्षेत्रातील सल्लागार म्हणून निर्णायक भूमिका बजावेल.

GPT म्हणजे भविष्यातील Google

ज्याप्रकारे GPT सध्या प्रगती करत आहे त्यानुसार सर्च इंजिन आणि GPT हे लवकरच एकत्रित एखाद्या प्रणालीत उपलब्ध होऊ शकतील ( Bing आणि GPT यांचं काम चालू आहे.)

GPT च्या मर्यादा
-२०२१ पर्यंतचा डेटा फीड असल्याने, २०२१ नंतरच्या घडामोडींसंबंधी या प्रणालीला मर्यादित माहितीचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे.

-‘CHAT GPT मुळे knowledge sector मधील मनुष्यबळ मागणीवर परिणाम होऊ शकतो’ हे मत जागतिक अर्थतज्ज्ञ पॉल क्रेगमन यांनी व्यक्त केलं आहे.

-GPT हे फीड डेटावर आधारित उत्तर देते त्यामुळे ते मानवी मेंदू इतके समजूतदार नाही. GPT ने दिलेले उत्तर तपासून मगच याचा वापर केला जाऊ शकतो थोडक्यात प्रश्नांची उत्तरे देताना सामान्य ज्ञानाचा अभाव असेल.

-भावनिक परिस्थितीचे विश्लेषण करण्यात यशस्वी होत नाही.यासाठी एखाद्या गोष्टीचा संदर्भ समजणे कठीण आहे.

CHT GPT कसे वापरावे ?

-तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल मधील कोणत्याही ब्राऊझर वरुन chat.openai.com या लिंकवर जा.

-या लिंकवर गेल्यानंतर sign up करा. ईमेल आयडी टाकून, मोबाईल नंबर टाकून continue वर क्लिक करा.

-मोबाईल नंबर वर आलेला सहा आकडी OTP टाकून लॉग इन करा.

GPT चे नवीन अपडेट –
अशी कल्पना करा की तुम्ही घरी एकटे आहात आणि तुम्हाला खाण्यासाठी काय करावे हे सुचत नाही,अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूचा फोटो क्लिक केला आणि चॅटबॉटला ते पाहून तुम्हाला कोणती डिश बनवता येईल, असे विचारले तर चॅटबॉट तुम्हाला 2 पाककृती त्वरित पाठवते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा ते तुम्हाला उपचारांचा सल्ला देखील देते आणि जोक्स सांगून तुम्हाला हसवते देखील.

या गोष्टी आता केवळ काल्पनिक राहिलेल्या नसून GPT-4 ने आधीच ते करायला सुरुवात केली आहे. खरं तर, 14 मार्च रोजी, ओपन एआय कंपनीने GPT-4 लाँच केले आहे, जी त्यांच्या ChatGpt उत्पादनाची नवीन अत्याधुनिक आवृत्ती आहे. हे पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील, विश्वासार्ह आणि अचूक माहिती देणारे आहे.

Chat GPT 4 मध्ये काय बदल जाणवतील –

-GPT-4 सर्व प्रकारच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देईल

आता GPT-4 सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे पूर्वीपेक्षा अधिक अचूकपणे देईल. अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीवर संशोधन करणाऱ्या ओरेन एटझिओनी नावाच्या व्यक्तीने चॅटजीपीटी आणि जीपीटी-4 च्या आधीच्या व्हर्जनला असेच प्रश्न विचारले. याद्वारे त्यांनी अचूक माहिती कोण देते हे तपासले. विचारलेल्या प्रश्नांवर GPT-3.5 ने या प्रश्नाचे उत्तर चुकीचे आणि GPT-4 ने बरोबर दिले आहे. कारण ओरेन एटजिओनी आणि एली एटजिओनी यांच्यात पिता-पुत्राचे नाते आहे. जीपीटीची नवीन आवृत्ती पूर्वीपेक्षा अधिक अचूक असल्याचे यावरून दिसून येते. वास्तविक, GPT-4 ने ऑगस्टमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केले, त्यामुळे ओरेन एटजिओनी यांनी एलन इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे सीईओ पद सोडले आहे, हे सांगता आले नाही.

-फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा फोटो बघून, जेवणात काय तयार केले पाहिजे हे कळेल.

ChatGpt किंवा GPT-3.5 केवळ मजकूराची भाषा समजू शकते, परंतु आता GPT-4 मजकूर तसेच छायाचित्र देखील समजू शकते. ओपन एआय या कंपनीचे सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन म्हणाले की, मी माझ्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या फोटोंद्वारे प्रश्न विचारला. याला उत्तर देताना जीपीटी-4ने खाण्यासाठी काय बनवावे हे सांगितले.

-GPT-4 रुग्ण आणि रोगांवर उपचार सांगेल

नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाचे प्राध्यापक अनिल गेही यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एक रुग्ण उपचारासाठी आला होता. त्या रुग्णाची समस्या सांगून त्यांनी GPT-4 ला विचारले की, या आजारावर उपचार कसे करावे?

यानंतर जीपीटी-4 ने विचार केला तसेच योग्य पद्धतीने उपचार आणि औषध देण्याचे सुचवले. प्रोफेसर अनिल सांगतात की, जीपीटी-4 चे उत्तर ऐकल्यानंतर असे वाटले की ते वैद्यकीय शास्त्रात पारंगत झाले आहेत.

एवढेच नाही तर जीपीटी-4 औषधाच्या संयुगाची माहितीही सांगू शकतो. या औषधाचे सेवन केल्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबतही तो सविस्तर माहिती देऊ शकतो. ते म्हणतात की या तंत्राद्वारे भविष्यात शास्त्रज्ञांना H3N2 विषाणूपासून इतर गंभीर आजारांवर उपचार मिळण्याची शक्यता आहे.

-GPT-4 हा लेख किंवा शोधनिबंध थोडक्यात स्पष्ट करू शकतो

आजच्या काळात लोकांकडे वेळेची कमतरता आहे. अशा परिस्थितीत, GPT-4 वृत्तपत्राचे दीर्घ लेख किंवा शोधनिबंध थोडक्यात स्पष्ट करू शकतो. GPT-4 हे लांबलचक लेख किंवा शोधनिबंध माणसांप्रमाणेच समजू शकतात हे पाहून शास्त्रज्ञ थक्क झाले. एवढेच नाही तर एका लेखाचा चुकीचा सारांश लिहिल्यानंतर शास्त्रज्ञांनी GPT-4 ला विचारले की हा सारांश बरोबर लिहिला आहे का?

याला उत्तर देताना GPT-4 ने सांगितले की, लेखातील सर्व महत्त्वाचे मुद्दे या सारांशात लिहिले आहेत, परंतु त्यात एक तथ्य चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले आहे. या वस्तुस्थितीचा लेखाच्या मूळ मजकुरात कुठेही उल्लेख नाही. GPT-4 चे हे उत्तर ऐकून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले.

-GPT-4 विनोदबुद्धीने विनोद सांगून तुम्हाला हसवतो

तुम्ही एकटेच बसला आहात. तुमच्याशी बोलायला आजूबाजूला कोणी नाही. अशा वेळी GPT-4, विनोदाच्या भावनेने विनोद सांगून तुम्हाला हसवू शकते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की विनोद सांगण्याच्या बाबतीतही GPT-3.5 च्या तुलनेत GPT-4 ची विनोदबुद्धी आश्चर्यकारक आहे.

GPT-4 परीक्षेत विचारलेल्या 81% प्रश्नांची अचूक उत्तरे देते

जीपीटी-4 परीक्षेत विचारलेल्या 81% प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. संशोधनात असे आढळून आले की अमेरिकेतील 41 राज्यांमध्ये होणाऱ्या युनिफॉर्म बार परीक्षेत विचारण्यात आलेल्या 1600 प्रश्नांपैकी GPT-4 ने 1300 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यापूर्वी ChatGpt या चाचणीत नापास झाले होते. GPT-4 ला देखील वैद्यकीय ज्ञान स्व-मूल्यांकन कार्यक्रमात 75% गुण मिळाले आहेत. तर GPT- 3.5 ला या परीक्षेत फक्त 53% गुण मिळाले आहेत.

-GPT-4 च्या माध्यमातून कोर्टात केस लढणे सोपे होईल

प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याबरोबरच, ChatGpt-4 ने न्यायालयाच्या फाइल्स हाताळण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे खटला लढवण्याची किचकट प्रक्रिया सुलभ होऊ शकते, असे मानले जाते. याचे कारण म्हणजे ChatGpt-4 सिंगल क्लिकवर ‘Lawsuit’ दाखल करू शकते.

आपल्या देशात लाखो लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावत नाहीत कारण खटला तयार करणे ही एक किचकट प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत, जीपीटी-4 च्या माध्यमातून ही अडचण कमी होणे अपेक्षित आहे.

GPT-4 भविष्य सांगू शकतो का?

जीपीटी-4 भूतकाळातील घटनांशी संबंधित प्रश्नांची अधिक अचूक उत्तरे देऊ शकते, असेही संशोधनात आढळून आले आहे. GPT-4 भविष्यातील प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम नाही. काहीतरी नवीन सांगण्याऐवजी, त्या विषयावर आधी घडलेल्या गोष्टींशी संबंधित उत्तर देते.

वरील सर्व विश्लेषणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या टेक्नोसेव्ही जगात काळानुसार चालण्यासाठी GPT चे फायदे आणि मर्यादा समजून घेऊन याचा वापर केला तर निश्चितच मानवी जीवन विकासाच्या पुढच्या टप्प्यावर असेल.

✒️ विजय गोपाळराव पवार

Leave a Reply