स्वराज्य !
उभ्या भारतभूमीला स्वत्व आणि स्वाभिमानाचा परिपाठ घालून देणारं, महाराष्ट्राच्या पावन भूमीत पराक्रमाच्या समीधेवर घडवून आणलेला एक क्रांतिकारी अग्नीहोम ! या युगप्रवर्तक पावलात हजारो मावळ्यांनी आपल्या पराक्रमाने, आपल्या कर्तृत्वाने गाथा लिहिल्या . या गाथा आज साडेतीनशे चारशे वर्षानंतरही आणि अनंत काळापर्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील.
स्वराज्य उभं करण्यासाठीची संकल्पना महाबली शहाजीराजे आणि मॉंसाहेब जिजाऊ यांनी लिलया उतरावली आणि या संकल्पनेला मूर्त रुप दिलं ते युगपुरुष छत्रपती शिवरायांनी , या रयतेच्या राज्याचा सांभाळ आणि विस्तारासाठी अविरत कष्ट घेतले छत्रपती शंभुराजांनी ! शिवकाळात पाचही शाह्या आणि फिरंग्यांना तलवारीच्या धाकात ठेवण्यासाठी हरएक मावळ्याने जिवाचं रान केलं , स्वराज्यधर्म,कर्तव्य परायणता यापुढं सर्वकाही गौण माणलं या जिगरबाज वीरांनी !
आज आपण अशाच एका वीराची नव्हे नरसिंहाची ओळख करुन घेणार आहोत लेखक ‘प्रेम धांडे’ लिखित ‘शिवनेत्र बहिर्जी’ या ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून !
बहिर्जी ! कोण बहिर्जी ? कुठून आले ? त्यांचं मुळ कुठलं ? इतिहासकारांच्या आणि साहित्यिकांच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलेला किंवा सर्वतोपरी अन्याय झालेला अनमोल हिरा म्हणजे बहिर्जी ! आजपर्यंतच्या साहित्यात तुरळकच आणि मोडकातोडका उल्लेखित असलेल्या रणमर्द नरसिंहाची ऐतिहासिक कहाणी म्हणजे शिवनेत्र बहिर्जी ! प्रेम धांडे यांनी या अनमोल हिर्याच्या कार्यकर्तृत्वाच्या कहाणीला पैलू पाडण्यासाठी आरंभिलेल्या साहित्यिक यज्ञकुंडातील पहिली समिधा शिवनेत्र बहिर्जी !
आदिलशहाच्या हुकुमावरुन मुरार जगदेवाने पुण्याच्या मातीवर गाढवाचा नांगर फिरवला आणि आधीच गुलामगिरीत असलेल्या मुर्दाड रयतेला आणखी धाकात घेतलं , पुणे जहागिरीची जबाबदारी शहाजीराजांनी मॉंसाहेबांना दिली आणि शिवरायांनी मॉंसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यास प्रारंभ केला. रयतेच्या मनात असलेली भिती दूर करण्यासाठी मॉंसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवत जमिनीसोबतच मानसांची मनेदेखील नांगरली . शेतकऱ्यांच्या मनात स्वत्वाची स्वाभिमानाची मशाल पेटवली , आपण पिकवू आणि रक्षणदेखील करु ही भावना बाळसं धरु लागली. पिकलेल्या रानात रानडुकरांचा कोल्ह्या लांडग्यांचा हैदोस वाढत होता , रयत मेटाकुटीला आली होती मॉंसाहेबांनी दूरदृष्टी लावत फक्त या जनावरांचाच बंदोबस्त न करता शिवबांच्या साथीला, जिवाला जीव देणारे रणबहाद्दर मावळे निवडण्यासाठी या जनावरांची शिकार करुन जे कोणी पुरावा म्हणून शेपटी आणतील त्यांना शिवबाच्या हाताने मानाचं कडं जाहीर केलं आणि बघता बघता काळ्या मातीत कसलेल्या मावळ्यांच्या पराक्रमाची धग नजरेस येऊ लागली अशातच एका रात्री रामोशाचा दौलतराव अठरा-वीस शेपट्या घेऊन राजांना भेटायला आला आणि हाच दौलता रामोशी आपल्या शिवबा राजांचे आणि पर्यायाने स्वराज्याचे कान नाक डोळे असणारे बहिर्जी नाईक !
लेखकाने दौलतराव रामोशी आणि शिवबाराजांच्या भेटीचा प्रसंग ज्या पद्धतीने मांडला आहे डोळे आपोआप पानवतात आणि मन आणि मेंदू आपोआप मुजरा करतो. शिवबाराजांनी दौलतरावांच्या अंगभूत कौशल्ये आणि गुणांना पारखत पाची शाह्यांना पाणी पाजण्यासाठी दिलेली तिसऱ्या डोळ्याची उपमा सार्थकी लागते. स्वामिनिष्ठेचं परिमाण असणाऱ्या कान्होजी जेधे यांच्या कडून गुप्तहेर विभागाचं घेतलेलं ज्ञान मिळालेला कानमंत्र अंगी बानवत दौलतरावांनी रहीम बाबा बनून फत्ते केलेली विजापूर मोहीम , कान्होजी जेधेंच्या मित्राला प्रताप कोळीला स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यात दिलेला प्रवेश इ. प्रसंग वाचकांना एक विस्मयकारक अनुभव देऊन जातात. दौलतराव रामोशाचा बहिर्जी पथक निर्माता बहिर्जी नाईक होण्याचा प्रवास शिवबाराजांच्या दूरदर्शी नजरेनं बरोबर ओळखला होता. गुप्तहेर असले तरी एक माणूस म्हणून असणारी बहिर्जींची हळवी बाजू पत्नी शारदेच्या भेटीच्या ओढीतून लेखकाने स्पष्ट मांडली आहे. हेरपथक उभारताना गुप्त ठिकाणांची असणारी आवश्यकता ओळखून बहिर्जींनी सारंगासारख्या हेरांच्या मदतीने अनेक ठिकाणं उभारली. स्वराज्याची शपथ घेतलेला प्रसंग वाचताना लेखकाने वाचकांच्या सर्वांगात पेटवलेलं स्फुल्लिंग उर्जा देऊन जातं . स्वराज्याच्या गुप्तहेर पथकात होणाऱ्या नेमणुकाची चुणुक पहिली महिला हेर मार्जीना सुलताना , कावेरी यांच्या नेमणुकातुन दिसून येते.भिमाजीरा
व देशपांडे बनून फतेहखानाचा केलेला पाडाव ही भविष्यातील प्रत्येक लढाईतील गुप्तहेर पथकाच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची नांदी होती. बाजी शिरवळकरांना हैदर बनवून शहाजीराजांच्या सुटकेसाठी केलेला हरएक प्रयत्न असेल किंवा औरंगजेबाच्या
ताफ्यात घुसून मीर जुम्लाच्या बुद्धीचा केलेला भेद लेखकाच्या लेखनशैलीस एका वेगळ्याच उंचीवर पोचवतो.कांतीलाल शेठ बनून श्रीगोंदा पेठेवर केलेली छापेमार अन् लूट बहिर्जींच्या अगणित अंगभूत अष्टपैलू गुणांचं दर्शन घडवते. औरंगजेबाच्या फौजेने केलेलं आक्रमण रोखत आदिलशाहीला दिलेलं जीवदान बहिर्जी पथकाच्या आकाशाएवढ्या कार्याचा आढावा मांडतं .
लेखक प्रेम धांडेंनी उचलेलं शिवधनुष्य बहिर्जीकार्याचा आरसा वाचकांच्या नजरेसमोर उभा करतात. कादंबरी न म्हणता एका राष्ट्रीय चारित्र्याच्या कर्मग्रंथाचा उहापोह लेखकाने यशस्वीरीत्या मांडला आहे. प्रत्येक शिवभक्ताला आणि इतिहास अभ्यासकाला बहिर्जींची फक्त एक गुप्तहेर एवढीच ओळख न ठेवता ते स्वराज्य कार्यातील शिवनेत्र का होते याची परखड मांडणी करण्यात लेखक प्रेम धांडे यशस्वी झाले आहेत.
प्रत्येक वाचकाला उत्सुकता आहे पुढील भागाची ! लेखकाच्या लेखणीतून असेच शिवकार्य घडत राहो आणि बळकट होत जाणाऱ्या लेखणीला बहिर्जींच्या कार्यकर्तृत्वापुढं नतमस्तक होत मानाचा मुजरा !!!