झोंबी-लढा आहे आर्थिक दारिद्रयाचा मानसिक दारिद्रयाशी ,
झोंबी-लढा आहे अंधकारमय वर्तमानाचा येणाऱ्या उज्वल भविष्याशी ,
झोंबी-संघर्ष आहे अशिक्षितपणाच्या खळग्यातून शिक्षित होऊन वाहणाऱ्या झर्याशी ,
झोंबी-प्रवास आहे शुन्यापासून मॅट्रीकपर्यंतच्या गुणपत्रिकेशी
जिथे पोटाची आग विझवायला भाकरीचा तुकडा मिळत नाही त्या आंद्याचा मॅट्रिकला तालुक्यात क्रमांक मिळवणार्या आनंदशी !
महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्यसंस्कृतीतलं कर्णाचं कवचकुंडलं असणारं गोमटं स्वप्न म्हणजे झोंबी !
एक वर्षाच्या तारीचं आठ वर्षाच्या रतनु सोबत झालेल्या लग्नाच्या घटनेनं या कथेची सुरुवात होते !
स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण संस्कृतीचा कौटुंबिक बाज वाक्यावाक्यातुन अनुभवायला मिळतो. रतनूच्या लग्नापासून रतनू त्याचा बा , आई आणि तारा तिची आई , बा यांचे संबंध मैत्रीच्या धाग्याच नात्यात झालेलं रुपांतर आणि कालानुरूप झालेलं स्थित्यंतर मानवी मनाचा परिघ उलगडून सांगतो. पोरीच्या बापानं तिच्या लग्नात तिला घातलेल्या पुतळ्या दारुसाठी विकल्या आणि दोन्ही कुटुंबात विस्तव पडला तो कायमचाच ! नकळत्या वयात आईपण आल्यानं ताराला जबाबदारीनं ओढाताण होऊ लागली. सलग दोन पोरी झाल्याने सासूसासरे हाय खाऊन गेले ही बोचण ताराला रुखरुख लावून गेली तसेच मुलगा होत नाही म्हणून सोडचिठ्ठी पर्यंत गोष्ट पोचली.शेवटी एकदाचा रतनू जकात्याला देव पावला आणि आपले लेखक ‘आनंद यादव’ म्हणजेच कथेतल्या आंदा जकात्याचा जन्म झाला. स्त्री पुरुष भेदाभेद नेमका कुठल्या थराला जाऊ शकतो याचं जिवंत वर्णन लेखकाने उभं केलं आहे. जबाबदारी नसलेला आडदांड नवरा आणि मुलगा होण्यासाठी जाच करणारे सासू सासरे यांच्या जाचातून आंद्याच्या जन्मानं तारा बाहेर पडली. जन्मापासून आईच्या छायेखाली आणि बापाच्या दडपणाखाली आंद्याची जडणघडण चालू होती. शाहूमहाराजांच्या कृपेनं गावगाड्यात खेडोपाड्यात शाळा पोहोचल्यानं आंद्याच्या शाळेचा श्रीगणेशा झाला. शाळेचं वर्णन , शिक्षकांची वागणूक , आजूबाजूला घडणाऱ्या छोट्यामोठ्या घटना , जोगतिन नायकिणीचा प्रसंग आंद्याला आयुष्याकडं बघायचा एक वेगळाच दृष्टिकोन शिकवून जातात. बिड्यांच्या थोटक्याचा क्षण , बापानं पोराला वाईट सवयी लागू नये म्हणून मारलेले व्रण एक वेगळीच छटा उभ्या करतात.
पोरीच्या लग्नात मिरवणारा बाप , प्लेगच्या साथीच्या वेळी मळ्यात कुटुंबाला सांभाळणारा (?) बाप , गोष्टींची पुस्तकं वाचण्यासाठी घरातले पैसे चोरलेल्या पोराला तुडवणारा बाप अशा नकारात्मक घटनांनी आंद्याच्या बापाला म्हणजेच रतनूला कथेचा नायक / खलनायक बनवलं. अंग मोडणारं काळवेळ न बघता जीव सोलवटणारं काम तसेच एकामागोमाग आठदहा पोरं झाली आईची मनस्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झालेली. आंद्याच्या आईनं बाळाव्हंजीला बोललेलं ‘या लेकरांना आफुची गोळी देऊन कायमचं शांत करते’ हे वाक्य मातृत्व किंवा माया या भावनेला बिकट मनस्थितीच्या काळात कशी ढवळून काढते याचा प्रत्यय देते.
वाढत जाणारं वय आंद्याचा संघर्ष देखील वाढवत होतं , फक्त आंद्याच नाही तर आई , भावंडं यांचा जगण्याचा संघर्ष किड्यामुंग्याच्या आयुष्याचा आरसा माणसाच्या जगण्याला दाखवत होतं. एका बाजूला शिक्षणाप्रती वाढत जाणारी आस्था महात्मा फुलेंच्या ‘विद्येविना मती गेली’ या वाक्याचा प्रत्यय देत होती तर घरात असणारं अठराविश्व दारिद्र्य आर्थिक आणि मानसिक रित्या नाड्या आवळत होतं , शेतीच्या कामाला कोवळ्या आंद्याला गणपासोबत जुंपून बा गावभर टवाळक्या करत होता , घराची झालेली डागडुजी बा म्हणजेच दादाला पोकळ मोठेपणा देत होती ,त्यात पडलेला दुष्काळ , मळ्यासाठी मालकासोबत कोर्टात लागलेली केस, न थांबणारी पोरांची रीघ , पोटाची आग मिटवण्यासाठी आईची होणारी तडफड , थेटरात पिक्चर बघण्यासाठी आंद्या करत असलेल्या चोर्या , शाळेत जाण्यासाठी तगमगणारा आंद्याचा जीव हे सारं वाचताना ते प्रसंग जशासतसे वाचकांच्या पुढे उभे राहतात. गांधीहत्येनंतर ग्रामीण भागात उद्भवलेली परिस्थिती माणसातून माणूसपण हिरावून घेत प्रत्येकाला काहीतरी देऊन गेली , एवढ्या जीवघेण्या परिस्थितीत देखील आंद्या वाचन लिखाण करीत स्वतःला घडवत होता .
सातवीत जाताच आंद्या जकात्याचा आनंदा झाला यामुळे लेखकाला आत्मविश्वासाची जाणीव झाली. न चुकणारा बापाचा मार खात आनंदा सातवीच्या वर्षात झगडत होता , सातवी पास झाला तर पोरगा कुठं तरी चिकटंल या भावनेनं दादानं आनंदाला परीक्षा द्यायची मुभा दिलेली पण अठरा वर्ष वयाच्या अटीनं घात केला आणि दादाचा पारा चढतंच मास्तरांनी फसवलं या भावनेनं दादा मास्तरांना शिव्या घालत होता. दारिद्रयात पिचलेल्या कुटुंबात भाऊबिजेच्या सणाचा प्रसंग डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. इंटरमिडीएटच्या परिक्षेदिवशीच बहिणीचा झालेला मृत्यु आनंदाला मोडकळीस आणणारा ठरला. ब्राह्मणाच्या घरात पेंढ्या विकायला गेलेल्या आनंदाला जातीभेद आणि आर्थिक विषमतेची जाणीव चटका लावून गेली. माध्यमिक शाळेतला फ्रीशिपसाठी आनंदाने केलेला संघर्ष मन हेलावून टाकतो. पुस्तकं विकत घेण्यासाठी आईबापापासून गुपचूप लपून चोर्या करायची सवय आनंदाची विदारक परिस्थिती डोळ्यासमोर उभा करते. दहावीच्या वर्षाची सुरुवात आनंदासाठी धडधडणारी ठरली , वार्षिक फीससाठी कागल कोल्हापुरात आनंदाने केलेल्या नकलांच्या कार्यक्रमात आलेले अनुभव शिक्षीत माणसांची माणसिकता किती संकुचित होते याचं दर्शन घडवते.
एस एस सीच्या वर्षाच्या सुरुवातीलाच दादा आणि आनंदाचा झालेला विसंवाद , दादानं जीव जाऊस्तोवर तुडवलेला आनंदा , शिक्षणाच्या गंगेत न्हाहण्यासाठी जन्मदात्या बापासोबत झगडणारा आनंदा वाचकाला लढाऊ बाणा शिकवून जातो. काहीही करुन शिकलं पाहिजे ही गोष्ट आनंदाला स्वस्थ बसू देत नव्हती आणि एकदाचा आनंदा एस एस सी पास झाला.
झोंबी वाचताना एक क्षणदेखील कथेतून मन बाजूला होत नाही , आजच्या पिढीला शिक्षणासाठी त्यांचे आईवडील ज्या पद्धतीने पाठपुरावा करतात त्यापुढं झोंबी उभा केली तर कुठल्याही भावनिक वाचकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहणार नाहीत. हे कथानक म्हणजे जीवघेण्या दारिद्रयाचं केलेलं श्रीमंत वर्णन आहे.
जेव्हा ही आत्मकथा पुर्ण वाचतो तेव्हा झोंबीच्या मुखपृष्ठावर असलेल्या चित्राचा अर्थ लक्षात येतो. मुखपृष्ठावर असणारा पुर्ण काळा भाग म्हणजे आनंद यादव आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आयुष्यात असणारा अज्ञानाचा अंधकार दर्शवतो तर चित्रात असणार्या दिवळीतील दिवा आणि दिवळीतील पुस्तकं या अज्ञानरुपी अंधकारात शिक्षणाने येणारा उजेड दर्शवतात , त्यामुळे मुखपृष्ठावरील चित्रात मानसिक आणि आर्थिक दारिद्रयाची शिक्षणासाठी होणारी झोंबाझोंबी आनंद यादवांनी यथार्थ मांडली आहे.
ध्येय गाठण्यासाठी धडपडणाऱ्यासाठी , धडपडत पडणाऱ्या प्रत्येकाला एक नव उर्जा देणारा संघर्ष म्हणजे झोंबी !
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त या कलाकृतीला मनापासून सलाम !!!