You are currently viewing नवआचार नवविचार दृष्टी देणारी शिवजयंती

नवआचार नवविचार दृष्टी देणारी शिवजयंती

???????? आरं द्या बत्ती तोफांना
गड शिवनेरीवर थोरलं धनी आलंया !!!????????

मुजरा राजं….।।।

साडेसातशे वर्षांच्या गुलामगिरीच्या अंधकारातून उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला , देव, देश, धर्म , स्वाभिमान याची जाणीव ज्यांनी करुन दिली आणि स्त्रिमातेच्या अब्रूची लक्तरं जेव्हा रानावनात टांगली जात होती तेव्हा कायद्याचा धाक दाखवून स्त्री मातेला ज्यांनी देव्हाऱ्यातील देवतेचा दर्जा दिला अशा युगपुरुष छत्रपती शिवरायांची आज जयंती !!!
अख्ख्या हिंदुस्थानाचं भविष्य जिथं उजाडलं त्या किल्ले शिवनेरी गडावर मराठेशाहीचा सुर्योदय झाला आणि युगप्रवर्तक छत्रपती शिवराय जन्माला आले.
साडेतीनशे वर्षानंतरही महाराजांचं कर्तृत्व मुर्दाड झालेल्या आमच्या मनगटात आजही बळ देतं काय कारण असेल याचं ? आजही नाही सांगावं लागत महाराष्ट्रात जन्मनार्या बाळाला शिवराय कोण होते , जन्मतःच ही महाराष्ट्राची माती त्या बाळाच्या भाळावर छत्रपती शिवराय नाव कोरुन पाठवते . अरे कसलं हे कर्तृत्व ! कसलं हे अलौकिक असामान्य युगप्रवर्तक दिशादर्शक राष्ट्रीय चारित्र्य !!!
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.ज्यावेळी आपण जागतिक इतिहासाचा विचार करु तेव्हा जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता तसेच यांचं राज्य महत्वकांक्षेपायी होतं ; तर महाराजांना रयतेचे राज्य शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे रयतेसाठीचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.
शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे आंत्रप्रिन्यूर होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले “पर्मनंट शिफ्टवाईज सैन्य” त्यांनी उभे केले. देशातील पहिलं मातीचं धरण खेड शिवापूरला महाराजांनी बांधलं, देशातील पहिली सहकारी संस्था मॉंसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी सुरु केली, Father of Indian Navy म्हणून आपण महाराजांचा उल्लेख करतो कारण देशातील पहिलं नौदल महाराजांनी उभं केलं.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
“कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील,कोण्ही भाकर,कोण्ही गवत,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही….रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही…” राज्याभिषेकाच्या एक महिना आधि महाराजांनी आपल्या सैन्याला लिहिलेल्या पत्रावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती असे दिसून येते.आजच्या राजकारणी लोकांचा विचार केला तर जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका असे सांगणारे माझे शिवराय कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठासहित निसर्गातील हवेवरदेखील आपला हक्क सांगणारे आजचे नेते कुठे!
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता. दुष्काळात रयतेला बी बियाणं यासाठी मदत करणारे शिवराय आणि दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या अनुदानावर स्वतःची पोळी भाजणारे आजचे राजकारणी यांचा विरोधाभास झणझणीत अंजन टाकणारा आहे. राज्याच्या विकासासाठी
व्यापाराचं महत्व राजांना माहिती होतं म्हणूनच “साहुकार हे तो राज्याचे भुषण” असे महाराज म्हणत.
जागतिकीकरणाच्या तसेच यांत्रिकीकरणाच्या आजच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचं आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी हे वाक्य प्रमाण म्हणून घेतलं असतं तर आज कदाचित भारत हे विकसित आणि जागतिक पातळीवर दिशादर्शक असं राष्ट्र असते. येणाऱ्या काळाची पावलं ओळखून आपली भूमिका आखणं यात महाराजांचा हातखंडा होता म्हणून तर भविष्यातील परकीयांच्या व्यापाराचा धोका ओळखून महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पोर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले. यातून महाराजांची नियोजनबद्ध दूरदृष्टी दिसून येते.
प्रत्येकाने आपला धर्म जपावा पण अंधश्रध्दाळुपणानं नव्हे तर डोळसपणे याचं मूर्तीमंत चालकं बोलकं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय ! महाराजांचा जगद्गुरू तुकाराम महाराज इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची पंढरपूरातील विठ्ठल असेल किंवा तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. ‘हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे’ असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते. स्वराज्यनिर्मीतीच्या शपथेतील ‘श्री’ हा वैयक्तिक देवधर्मासाठी वापरलेला नसून गोरगरीब गरजू रयतेसाठी वापरलेला आहे.ज्या काळात समुद्रात पाय ठेवणंही पाप होतं त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम महाराज हे महाराजांचे धाकटे पुत्र पालथे जन्माला आले तेंव्हा ‘मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.’ या शब्दानिशी आसमंतात उर्जा भरली ती महाराजांनीच !
राजनीतीधुरंधर, रणधुरंधर, क्षात्रतेजालंकृत या पदव्या महाराजांची राजनीती युद्धनीती, तसेच कुटनिती यावरील पकड दाखवून देतात.एक परदेशी इतिहासकार म्हणतो ‘कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हतं.’आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण ,मिर्झाराजे जयसिंगाशी केलेले अभ्यासपूर्ण राजकारण,अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका, सुरत लूट, राजापूर वखारीच्या माध्यमातून इंग्रजांवर बसवलेला वचक, कुतुबशाहाशी जपलेले मैत्रीपूर्ण संबंध, औरंगजेबाच्या विरोधात सबंध दक्षिण एकत्रीकरणाचा केलेला प्रयत्न, औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर ‘तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?’ असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची तसेच नियोजनात्मक समयसूचकतेची काही उदाहरणं आहेत.

आज आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घ्यायला नको म्हणतो , आपल्या अनास्थेमुळं आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठी भाषिक शाळा बंद पडत आहेत पण
महाराजांना स्वभाषेच्या असलेल्या अभिमानामुळेच महाराजांनी रघुनाथ पंडीतांच्या माध्यमातून ‘राज्यव्यवहारकोषा’ची निर्मिती केली.आज जागतिकीकरणाच्या विळख्यात आणि इंग्रजी भाषेच्या अतिशयोक्ती वापरामुळं मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी मोहिमा आखाव्या लागतात हेच आपलं अपयश आहे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अवलंब करणाऱ्या माझ्या राजांनी परस्त्री,परधर्म,परधर्मग्रंथ,परधर्मस्थळ यांचा आदर स्वतःच्या गोष्टीप्रमाणे केला. स्वधर्म रक्षणासाठी उचलेली तलवार फक्त धर्माच्या नावावर समाजाला अंधकारात ढकलणार्या आजच्या स्वार्थी राजकारण्यांसारखी न वापरता धर्मरक्षणातुनच एकात्मता कशी साधता येईल हे शिवरायांनी दाखवून दिलं याचंच उदाहरण म्हणजे छत्रसालच्या राजाला केलेली मदत होय ,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखलं नव्हे तर धर्म निवड ही सक्तीने करण्याची बाब नव्हे तर तो वैयक्तिक अधिकार आहे हे आमच्या राज्यघटनेतील कलम साडेतीनशे वर्षापूर्वी शिवशाहीत अस्तित्वात होता.
सार्या जगाला वेड लावणार्या गनिमी काव्याचे जनक म्हणून आपण महाराजांना ओळखतो, आजच्या काळातही महाराजांनी सांगितलेली युद्धकौशल्ये सुरक्षादलांना मार्गदर्शक ठरत आहेत. महाराजांनी स्वतःची ताकद ओळखुन ‘गनिमी काव्या’चा योग्य वापर करुन साम्राज्य उभारले. भावनेच्या भरात जाउन आमने-सामने युध्द न करता शत्रु बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकुन शत्रूची दाणादाण उडवण्याचे तंत्र अवलंबले.महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते. परकीय शत्रू किंवा गनीम यांच्या गोटात शिरुन त्यांच्या पोटातील गुप्त बातम्या काढण्याचं आणि महाराजांपर्यंत त्या बातम्या पोचवण्याचं कसब अवर्णनीयच होतं नाहीतर आजच्या इंटेलिजन्स टीम ! आजच्या आपल्या देशात हेरखाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधीकधी उभा रहातो.आपण आपल्या शत्रुला बेसावध कधीच गाठु शकत नाही उलट शत्रुच आपल्याला बेसावध गाठुन वेचुन वेचुन मारतो हे संसदेवरील हल्ला, २६/११ चा हल्ला असेल किंवा दंतेवाडा हल्ला , बालाकोट हल्ला असेल वरुन दिसुन येते.शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रुवर नेहमी लक्ष असायचे. गाफील राहणे तिथे चालतच नसे.म्हणुनच शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पोर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत.पण आजच्या परीस्थितीत आपण याबाबत कमालीचे गाफील दिसतो.आपला शत्रु चीन आपल्याला घेरण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो आहे.त्यांच्या राजधानीपासुन आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर सैन्य घेउन येण्यासाठी महामार्ग बांधतो आहे.त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करतो आहे तरीही आपल्याकडे याबाबत फारच उदासीनता आहे.आपले सैन्य ‘जो सर्वात उचापती करणारा शेजारी आहे(पाकीस्तान) त्याच्याविरुध्द जिंकण्याची आपली क्षमता असली पाहिजे’ या थिअरीनुसार चालतो असे दिसुन येते.म्हणुनच चीनसारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. आज जर आपण महाराजंची विचारसरणी अवलंबिली तर कोणाची हिम्मत नाही होणार आपल्याकडे नजर करायची ! खरं मार्गदर्शक परराष्ट्र धोरण महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. !

ज्या महाराजांच्या एकेका घटनेवरती कित्येक देशांनी प्रेरणा घेऊन नेत्रदीपक प्रगती केली आहे अशा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संतमहात्म्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य माणले पाहीजे. पण नाही आम्ही काय करतो तर प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला फक्त जयकार, मिरवणुका, डीजे, रॅलीज, मोठमोठे बॅनर्स , विकृत डान्स , बिअर बारच्या नाल्यातील दारु पिऊन नंगानाच ! शिवाजी महाराजांना हेच अपेक्षित असेल का आजच्या मावळ्याकडून ? अहो शिवशाहीत महिलेवर वाकडी नजर टाकल्यास चौरंगा करण्याचा वारसा असलेल्या माझ्या महाराष्ट्रात आज कोपर्डी घडते, हिंगणघाट घडतं, डोंगरगावात मायमाऊलीचा मेल्यानंतरही थरकाप उडवणारी घटना घडते अशा अनेक समोर न आलेल्या आक्रोश आणि किंकाळ्या आम्हाला मुगल साम्राज्यात नेऊन सोडतात ! आमचा तरुण काय करतोय तर टीकटॉक व्हिडीओ, पबजी गेम, फेसबुक व्हॉट्सऍप , आणि कमीजास्तीला राजकीय नेत्यांची चाटूगिरी या एवढ्या व्यस्त वेळापत्रकात आमच्या आजच्या मावळ्याला वेळच नाही समाजाकडं बघायला. खरंच एवढं मुर्दाड झालोय का आम्ही ? आमचा पुरुषार्थ नाकर्तेपणाच्या आणि लाचारीपणाच्या विळख्यात गुंडाळला गेलाय का ?
मावळ्यांनो , छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे , मॉंसाहेब जिजाऊ यांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालण्यासाठी आपण फक्त सुरुवात जरी केली तरी आपला समाज,आपले राष्ट्र सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. ‘शिवाजी महाराज की’ हे दुसरं कोणीतरी म्हटल्याशिवाय आपण जय म्हणणं जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत शिवरायांचे विचार आपल्या आचारात येणार नाहीत. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्,नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल. परस्त्री ही आपोआप माताभगिनी दिसून येईल. आपापसात जात धर्माच्या नावावर न भांडता देशात सौहार्दाचे वातावरण तयार होईल आणि छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याची वाटचाल नक्कीच सुराज्यात होईल. !!!

चला तर आज शपथ घेऊ नवनिर्माणाची ! नवमहाराष्ट्र घडवण्याची ! जातीधर्माची बंधनं तोडून या भारतभूला सुजलाम सुफलाम करण्याची ! शपथ घेऊ यापुढे कुठेच स्त्री सुरक्षा ही जबाबदारी समजण्याची ! संतमहात्म्यांच्या या भूमीचा गौरव द्विगुणीत करण्याची !!

Leave a Reply