हुंडारुपी बकासुर

कोपर्डीच्या बहिणीसाठी लाखोंनिशी मोर्चे काढणारा हाच का माझा मराठा समाज ?
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याशी एकनिष्ठ राहून रक्ताचं पाणी करणारा हाच का माझा मराठा समाज ??
समस्त बहुजनांचा मोठ्या भावाप्रमाणे सांभाळ करणारा, समाजाच्या रहाटगाड्याचा नेतृत्व करणारा हाच का माझा मराठा समाज ???
शिवकाळापासून पराक्रमाच्या धारेवर अन् तलवारीच्या पात्यावर मरण भाजणारा हाच का माझा मराठा समाज ???
क्रांती मोर्चाद्व्यारे शिस्त काय असते , मोर्चा कसा काढायचा असतो हे समस्त जगाला शिकवणारा हाच का माझा मराठा समाज ???
लेकीच्या शिक्षणासाठी भलेही आम्ही खर्च करायला मागे पुढे बघू पण तिथेच लेकीच्या लग्नासाठी शेताची जमिनीची राखरांगोळी करायला विचार करणार नाही. आजही आमच्या घरात लेक जन्माला आली की घरातल्या जुन्या जाणत्यापासून ते पोरीच्या बापापर्यंत सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात.
आजही आम्ही वंशाच्या दिव्यापायी नाजूक न उमललेल्या कळ्यांना खुडून डॉ. केंद्रे , डॉ.मुंढे, डॉ. मुंदडासारख्या मारेकर्यांना देवत्व बहाल करतो. कित्येक माऊलींना सासरच्या लोकांच्या हट्टापायी नऊ महिने सांभाळलेला गर्भ क्षणांत संपवावा लागला , साधं आपल्याला नखं काढताना बोटाला लागलं तर जीव कासावीस होतो त्या माऊलीचा पोटचा गोळा जर जात असेल तर त्याबद्दल विचार न केलेलाच बरा . मुलीच्या जन्मापासूनच मुलीला एक ओझं म्हणून वागवणारा आपला समाज तिचं पालनपोषण, शिक्षण याबाबतीत अगदीच कोरडी भूमिका घेतो पण तीच मुलगी जेंव्हा शिकून सवरुन स्वतःच्या पायावरती उभी राहते तेव्हा तिच्याच लग्नासाठी बाजारात बोली लावल्यासारखी बघायला येणारे स्वतःचे रेट सांगतात अन् या बोलीबाजाराला समाजाने हुंडा असं पारंपरिक व सोज्वळ नाव दिलं आहे. आजच्या काळात मराठा समाजात मुलगी जेवढी जास्त शिकली त्याप्रमाणात हुंड्याचा रेट लावला जातोय.
एखादी मुलगी जर उच्चशिक्षित असेल तर बघितला जाणारा वर हादेखील अतिउच्चशिक्षीत बघितला जातो आणि तिथून सुरुवात होते या बोलीबाजाराची ! जेवढं उच्चशिक्षित स्थळ तेवढाच त्यांचा मिजास जास्त , कांदेपोह्याच्या कार्यक्रमापासून सुरुवात झालेल्या माजुरेपणाचा दुसरा अध्याय हा मुलाने मुलीला पसंती दिल्यानंतर सुरु होतो . एकदा दोघांची (त्यातही फक्त मुलाची कारण मुलीला स्वतःचं मत असतं कुठं) पसंती आली की मुलाकडचे आणि मध्यस्थी म्हणून या बाजारात दलालाची भूमिका पार पाडणारा हिशोबाला लागतात आणि प्रॉपर्टी व्हैल्यूएशन करुन रेट सांगतात , या बाजारात मालाची (वराची) सामाजिक, आर्थिक, किंमत बघून ऐपत नसतानाही मुलीचा बाप बोली लावतो, एका ठराविक अन् अपेक्षित रकमेची बोली लागली की मुलाकडचे टोणगे विवाहाला होकार देतात . जसा या स्वत्व विकलेल्या , मनगटाची हाडं कुटून त्याचा भुगा झालेल्या अकर्तृत्ववान निष्क्रिय भिकार्यांचा होकार येतो तसं त्या मुलीच्या आई वडीलांना रात्र रात्र झोप लागत नाही , पाच ते सहा आकडी पगाराची नोकरी असणारे भिकारचोट टोणगे आणि त्याच्या घरचे अन् हा समाज जुन्या बुरसटलेल्या परंपरांना हाताशी धरुन बिचार्या मुलीच्या बापाचं रक्त शोषायला सुरुवात करतो . मध्यस्थी म्हणून दलाली करणारा पाहुणा स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी सामाजाची भिती दाखवून , परंपरेची भिती दाखवून, नावाची – इज्जतीची शपथ घालून मुलीकडच्यांना लग्नात अपेक्षित सोयीसुविधांचं फर्मान सोडतो (हे फर्मान पैशासाठी हपापलेल्या त्या निर्ढव, भामट्या टोणग्यांकडून मागच्या दारानं याच्यापर्यंत आलेलं असतं). त्या सर्व अपेक्षित सोयीसुविधांची बाजाबूज करताना मुलीचा बाप अन् तिच्या घरचे घायकुतीला येतात.
हुंडा देणंघेणं ही पद्धत फक्त एकांगी नाहीये कारण ज्यावेळेस मुलाकडचे लोक या बोलीबाजारात उभं राहतात तेंव्हा त्यांनीही आपल्या मुलीसाठी एखाद्या बैलावर बोली लावलेली असते , त्या गोष्टीचा परतावा म्हणून मुलाच्या लग्नात एखाद्या मुलीच्या बापाकडून हेच भामटे दुपटीने वसूल करतात. हुंडा मागण्यासाठी दिलेलं दुसरं लाजीरवाणं स्पष्टीकरण म्हणजे आमच्या मुलाला भरमसाठ खर्च करुन आम्ही डॉक्टर, इंजिनिअर बनवलं तो खर्च वसूल नको का करायला ? तसेच आमच्या मुलाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे तर मग त्याच्या पगारानुसार नको का हुंडा द्यायला ? ज्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचं गार्हाणं सांगून हे भामटे भीक मागतात त्या पगारात यांना लग्नात घालायला अंर्त वस्त्र सुध्दा घेता येत नाहीत , अंगावर घालायच्या अंर्तवस्त्रापासून ते पायात घालायच्या बुटापर्यंत सगळ्याच गोष्टींची भीक मागतात हे टोणगे !

शेतकऱ्यांच्या पोरांचा मिजासदेखील या नोकरी करणाऱ्या भामट्यांपेक्षा कमी नसतो किंबहुना काकणभर जास्तच नखरे असतात. शेतातील एका एका काकरीच्या जीवावर स्वतःला जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकऱ्याचं पोरदेखील लग्नाच्या वेळी बाहू सरसावून हुंडा मागतय.
किती दिवस पुरेल हा हुंडा ? किती दिवस भागणार तुमचे त्या पाच पंचवीस लाखानं ? किती दिवस मिरवणार लग्नात भिक मागून घेतलेलं पाच पंचवीस तोळे सोनं ? अरे हुंडा मागणाऱ्यांनो तुमच्या या आशा अपेक्षा पूर्ण करता करता खचलाय तो मुलीचा बाप आणि अख्खं कुटुंब . आसवांची टिपुसं कोरडी पडलीयेत त्यांच्या, फक्त मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात कुठल्याही मराठ्यांच्या घरातलं लग्न कर्ज न काढता किंवा शेती न विकता होत नाही. प्रश्न फक्त वरपक्षाचा नाही मध्यस्थी करणारे दलाल स्वतःचं वजन दाखवण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी वरपक्षाकडून आलेल्या आणि यांनी (दलालांनी) थोपवलेल्या अपेक्षा मुलीच्या वडिलांकडे सुपूर्त करतात. त्या अपेक्षा पूर्ण करता करता अख्या कुटुंबाचे हाल बघवत नाहीत.

स्वाभिमानशून्य असनारे अन स्वताच्या क्षमतेवर विश्वास नसलेले तरुण हे आपल्या बापाने मुलीच्या बापाकडे “हुंडारूपी” मागितलेली भीक स्वीकारतात .

लातूरच्या शीतल सारख्या अनेक तरुणी या अशा लोकांच्या हलकट वृत्तीच्या बळी ठरत आहेत .

कॅशलेस ऑनलाईन खरेदी केली म्हणुन लातुरच्या एका लेकीला एक कोटी रुपये बक्षिस तर हुंड्याला कॅश नसल्यामुळे लातुरच्या दुसऱ्या कन्येची आत्महत्या…
किती हा विरोधाभास ???

समाजात अशा किती शितल परिस्थीतीच्या बळी ठरल्या असतील याची गिणतीही नाही!
समाज बांधवांनाे असे निरपराध जीवांचा बळी जाणे लाजीरवाणी बाब आहे.विचार बदलले पाहीजे.प्रतिष्ठा,थाटमाट,मानपान, हुंड्यासारख्या देवाणघेवाणी थांबवून,असेल त्या परिस्थीती प्रमाणे,अगदी शून्य खर्चावर विवाह करा,फाजील प्रतिष्ठा सोडून द्या.समृद्ध,श्रिमंत मराठ्यांनी वंचित,असहाय बांधवांना मदतीचा हात द्या.
मराठा तरूणांनो तुम्ही ठरवलं तर खुप काही करू शकता,कुणाच्या सांगण्याची वाट पाहू नका.सुरूवात आपल्यापासून करा.जगण्याचा संघर्ष करणार्या समाजबांधवांना मदतीचा हात देऊ.आपल्यापेक्षा गरीब कुटुंबांशी कोणतेही श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद न करता विवाहसंबंध केले पाहीजेत.सामुदायिक विवाहचळवळ पुढे न्यावी लागेल.श्रीमंत मराठ्यांचे शाही विवाह,बडेजाव याचे अनुकरण करणे टाळू.
मराठ्यांच्या वाडे अन् गढ्यांची चर्चा रंगविणारांना शितलच्या या दुर्दैवी अंताचे सोयरसूतकही नसेल.नसू द्या.हाही लढा लढू.शितलने मृत्यूपूर्वी लिहीलेली सोबतची चिठ्ठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं अंत:करण पिळवटून टाकणारी आहे.खुप दु:खदायक असलं तरी फिनिक्स पक्षाचाच मार्ग स्विकारावा लागेल.आत्महत्या करण्यापेक्षा संघर्ष करीत राहू.

भावांनो फक्त नावाची क्रांती उपयोगाची नाही तर दैनंदिन रहाटगाड्यात समाज मनावर परिणाम करणाऱ्या अनिष्ठ प्रथांशी दोन हात करणं ही क्रांती आहे . आज छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पाईक म्हणून मी शपथ घेतो की विवाहासारख्या पवित्र बंधनात गुंतताना आम्ही मराठा मावळे हुंडा म्हणून एक रुपयाचीही अपेक्षा मुलीकडून ठेवणार नाही. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला साक्षी ठेवून ना आमचे कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही हुंडाबंदीसाठी जागृक करु आणि यापुढे हुंड्यासाठी महाराष्ट्रातील एकाही जिजाऊच्या लेकीचा बळी जाणार नाही ही आमची वैयक्तिक जबाबदारी असेल

Leave a Reply