You are currently viewing व्हेंटीलेटर नात्यांचं

व्हेंटीलेटर नात्यांचं

आज व्हेंटिलेटर सिनेमा बघितला, खूप दिवसांपासून सिनेमा बघायला वेळ मिळत नव्हता , मग काल रात्री पुण्यातच ट्रॅव्हलींगमध्ये असताना युट्यूब वरुन डाऊनलोड करुन ठेवला आणि आज बघायचा ठरवलं.
सिनेमाच्या सुरुवातीला फक्त दोन चार पात्र एकमेकांशी फोनवर बोलताना आणि चर्चा करताना दाखवलेलं आहे. त्या चर्चेतून एवढं कळतं की त्यांचा कोणी नातेवाईक आजारी असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. मग सगळीकडे फोनाफोनी होते , सर्व नातेवाईकांच्या मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलंय गोष्ट पसरते आणि तिथूनच सुरू होते नात्यांचा अलिखित प्रवास !
भावकीतील कोणी गावाकडील आंब्याच्या बागा लिहून घेण्यासाठी , तर कोणी गावात व्हेंटिलेटरवरील पेशंटच्या जागेत संडास बांधण्यासाठी , तर कोणी गावाकडील घराच्या जागेची वाटणी करण्याचं बोलण्यासाठी मुंबईतील दवाखाना गाठतात तेदेखील अतीव काळजीने , या सर्व लोकांइतकी पेशंटची काळजी कोणालाच नाही .
त्यात पेशंट कोकणातील दाखवला आहे, आणि गणपतीला सात दिवस शिल्लक असताना पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं दाखवलं आहे , त्यामुळे सर्व भावभावकी विचार करून ठरवतात की गणपती होईपर्यंत पेशंटचा व्हेंटिलेटर काढायचा नाही, असाही पेशंट मरणारच आहे तर या पेशंट म्हणजेच गजाकाकामुळे गणपतीच्या सणाला सुतक पडायला नको म्हणून सर्वांचा अप्रतिम खटाटोप !
आणि या सर्व गोष्टींत गजूकाकाचा मुलगा प्रसन्न स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी वडिलांपासून कायमचा दुरावलेला , स्वतः अध्यक्ष असलेल्या गणपती मंडळाचा स्पर्धेत नंबर आल्यास नगरसेवक होण्यासाठी रस्ता मोकळा होणार असतो म्हणून स्वतःच्या वडिलांना गणपती होईपर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवणारा प्रसन्न ! राजकीय नेता जेव्हा लात देऊन हाकालून लावतो तेव्हा प्रसन्नला जाणीव होते बापाच्या प्रेमाची !

खरंच आजच्या काळात माणसाच्या जिवाची किंमत एखाद्याच्या स्वार्थापेक्षापण कमी आहे का ? आपले नातेवाईक , मित्र, सहकारी हे आजच्या घडीला आपल्यासाठी काहीच महत्त्वाचे नाहीत का ? आज नाती म्हणजे फक्त स्वार्थासाठी वापरली जाणारी प्यादी आहेत का ?
हा सिनेमा बघताना पहिले ४० मिनिटे गेले की भावना असणारा माणूस सिनेमा संपेपर्यंत रडतच सिनेमा बघतो , गजूकाकाला व्हेंटिलेटरवर ठेवलाय हे समजलं तसं प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेण्यासाठी दवाखान्यात येतो पण ज्यावेळी गजूकाकाच्या दवाखान्याचं बील द्यायची वेळ येते तेव्हा १,७५,०००₹ देण्यासाठी सर्वजण मिळून मदत करु शकत नाहीत. खरंच या सिनेमातून वर्तमान काळात ज्याप्रकारे नाती निभावली जातात त्याचं सुंदर चित्रीकरण मांडलं आहे !

एक काळ होता ज्यावेळी नात्यातला कोणी आजारी असेल तर आपण अख्या कुटुंबासह भेटायला जात असू पण आज नाती अशी परकी का झाली ? का आज आपला स्वार्थ आपल्या नात्यापेक्षा जास्त आपल्या डोक्यात गेला ?
का आज भाऊभाऊ शेताच्या एका काकरीसाठी एकमेकांच्या जिवावर उठले ? हजार दहा हजारासाठी बहिण भावाच्या नात्यात का वितुष्ट निर्माण झाले ? चुलत्या पुतण्याच्या नात्यात संपत्तीचा वाद किती दिवस चालणार ? का आपण एकसंघ कुटुंब म्हणून नाही जगू शकत ?
भावांनो नाती जपली पाहिजेत , नाती वाढवली पाहिजेत , एकमेकांच्या अडीअडचणीला एकमेकांना साथ दिली पाहिजे, कमावलेल्या पैशापेक्षा कमावलेली माणसं आणि जपलेली नाती साथ देणार आहेत हे कधी समजणार आपल्याला ?
शेवटी एकच सांगेन नातं कोणतेही असू द्या बहिण भाऊ , आई वडिल मुलगा, आत्या, मामा, काका, भाचा , दाजी , मेव्हणा, पुतण्या , मित्र , मैत्रीण,सहकारी, ही सर्व नाती पैशापेक्षा कितीतरी लाख पटींनी महत्वाची आहेत, पैसा आज आहे उद्या नाही पण ही सर्व नाती आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच आपण व्हेंटिलेटरवर जाईपर्यंत आपली साथ कधीच सोडणार नाहीत म्हणून नात्यांना कधीच व्हेंटिलेटरवर ठेऊ नका !!!
जपूया नाती मनामनांची
जपूया नाती ह्रदयांची !!!!!

Leave a Reply