You are currently viewing राजमाता जिजाऊ – आदर्श मातृत्वाचं त्रिकालाबाधित संस्कारपीठ

राजमाता जिजाऊ – आदर्श मातृत्वाचं त्रिकालाबाधित संस्कारपीठ

“हिंद मनाचे दैवत झाले शिवशंभु माऊली |
माता धन्य जिजाऊ झाली शिवबाची सावली ||
केला महाराष्ट्र साकार आई थोर तुझे उपकार |
दिला आम्हा तु आकार करुनी जिवाचे रान ||

साडेसातशे वर्षाच्या गुलामगिरीच्या अंधारात एक तेजस्वी ज्योत बनून उभ्या महाराष्ट्राला तेजोवलय प्राप्त करुन देणारं या सह्यभूमीला पडलेलं गोमटं स्वप्न म्हणजे मॉंसाहेब जिजाऊ !

महाराष्ट्राच्या मातीमधे रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगीरीच्या छाताडावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी राजे दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला. राजमाता जिजाऊंच्या वडीलांचे नाव लखुजी आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवागिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.

राजमाता जिजाऊ लहानपणापासून चाणाक्ष, बुद्धीने तेज होत्या. राजमाता जिजाऊंची आई म्हाळसा राणी जेव्हा त्यांना जिजा या शब्दाचा अर्थ त्यांना सांगत तेव्हा म्हाळसाराणी भावूक व्हायच्या. जिजा म्हणजे तुळजा भवानी, जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी. ती आदिमाया, देवी तुझ्या रूपात माझ्या पोटी आली असे सांगून राजमाता जिजाऊंचा आत्मविश्वास आणि महत्वकांक्षा त्या फुलवायच्या . राजमाता जिजाऊंचे थोरले बंधू राजे दत्तोजी यांनी जिजाऊंना तलवारबाजी करणे घोडे स्वारी चे प्रशिक्षण दिले. तसेच राजमाता जिजाऊंचे वडील राजे लखुजी यांनी युद्धशास्त्रातील शिक्षणाबरोबरच राजकारण, न्यायनीती यांचे सुद्धा धडे दिले.

राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला, प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांना राम, कृष्ण आणि भीम यांच्या गोष्टी सांगितल्या,सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारे प्रभू श्रीराम किती पराक्रमी होते, बकासुराचा वध करून दुबळ्या गरीब लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, दुष्ट कंसाचा नाश करणारा श्रीकृष्ण किती पराक्रमी होता हे सांगून प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे ही शिकवण बिंबवली. राजमाता जिजाऊंच्या अशा शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊंचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकर्यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदार्या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.
शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणार्याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले.

मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत.

महाराष्ट्र जशी विरपुत्रांची भुमी आहे तशीच विर मातांची देखील आहे हे राजमाता जिजाऊ माॅं साहेबांना पाहुन लक्षात येते.

दोन छत्रपतींना घडवणं हे काही सोपं काम नाही , नुसतं घडवलंच नाही तर देव देश आणि राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कर्तृत्व म्हणून उभा केलं, आजच्या आया एका लेकराला घडवतानाच दमून भागून जातात. साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच आजचा पुरोगामी महाराष्ट्र उभा आहे. परस्त्रीला मातेसमान मानून रांझ्याच्या पाटलाचा केलेला चौरंगा असेल किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची केलेली पाठवणी असेल आजही या महाराष्ट्रावर असणाऱ्या सर्वोत्तम संस्काराची साक्ष देतात.
आज आपण चालू पिढीच्या असंस्कृत वागण्या संदर्भात किंवा नितीमूल्यांच्या ह्रासासंदर्भात बोलतो तेव्हा मॉंसाहेब जिजाऊंच्या वारसाचा कुठेतरी विसर पडत चालला आहे हे मान्यच करावे लागेल. आजच्या प्रत्येक आईला आपला मुलगा शिवरायासम झाला पाहिजे असे वाटते पण किती आई जिजाऊ बनायला तयार आहेत ? मॉंसाहेबांचा त्याग , कर्तृत्व हे फक्त शिवराय आणि शंभूराजे यांना घडवणं इतकंच नाही तर स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजांच्या खांद्याला खांदा देऊन या भूमीला पारतंत्र्यातून स्वतंत्र करण्याचं ध्येय बाळगणारी सहचारिणी , शिवछत्रपतींना स्वराज्यस्थापनेसाठी पावला पावलावर मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शिका , शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा गाडा हाकणार्या चालक, राजनिती,युद्धनीती, समाजहीत , दूरदृष्टीता या सर्व गुणांचा अनोखा संगम असणारं स्त्रीनेतृत्व , भारतातील पहिली सहकारी बँक मॉंसाहेब जिजाऊंनी सुरू केली, गाढवाचा नांगर फिरलेल्या पुणे जहागिरीला सोन्याचे दिवस दाखवले अशा अनंत गोष्टी सांगता येतील पण गरज आहे आजच्या तुमच्या माझ्या पिढीने त्या तत्वांना त्या विचारधारेला आत्मसात करण्याची !

शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामातेन 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.

१२ जानेवारी फक्त जिजाऊ जयंती म्हणून साजरी न करता एका आदर्श मातेने घडविलेले दोन आदर्श छत्रपती यांच्या पराक्रमाला साक्ष ठेवून संस्कार दिन म्हणून साजरा केला तरच हा राष्ट्रीय दिवस सार्थकी लागेल

Leave a Reply