You are currently viewing स्वत्व स्वाभिमान आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लढलेला महासंग्राम – पानिपत

स्वत्व स्वाभिमान आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लढलेला महासंग्राम – पानिपत

१० जानेवारी १७६० !
उत्तरेत असणारा बुर्हाडी घाट आणि तिथे मराठ्यांचा असणारा मुक्काम मराठा दौलतीच्या पराक्रमी वारश्याला आणखी ठसठशीत करत होता. संक्रातीच्या बोचर्या थंडीतही मराठा दौलतीचा सळसळता पराक्रम रक्ताची उष्णज्वाला वातावरणात दाहकता निर्माण करत होती. निमित्त होतं मराठा फौजा दिल्ली रक्षणासाठी तैनात होत्या. दिल्ली मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली येणार हे निश्चितच होतं त्याला कारणही तसंच झालं होतं.
इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता.

लाहोरचा बंदोबस्त केल्यानंतर तर मराठ्यांचा राजा दिल्लीवर राज्य करणार हे जवळजवळ पक्के होते.
नजीबखान रोहिला आता फक्त वाटच बघत होता मराठ्यांच्या बिमोडाची , काहीही करुन दत्ताजीला संपवणं हे नजीबखानाचं आद्य कर्तव्य बनलं होतं आणि यासाठीच या नजिब्याने अफगाणी सुलतान अहमदशाह अब्दालीला आमंत्रण धाडलं होतं , एका बाजूला यमुना आणि दुसर्या बाजूला शुक्रतालावर अब्दाली अशा कात्रीत दत्ताजी सापडले होते;याउपर पेशव्यांना मदतीचे ७-८ खलिते गेले होते पण ना उत्तर ना मदत काहीच पोचलं नव्हतं तर दुसरीकडे होळकर देखील मानसपुत्राच्या (नजीबखान रोहिला) करतुतीने शिंद्यासोबतच्या अंतर्गत वादामुळे शांतच होते . शेवटी अपुऱ्या साधनंनिशी समोर उभ्या असलेल्या अब्दालीच्या आधुनिक बंदुकधारी फौजेवर तुटून पडायचा निर्णय दत्ताजींनी घेतला आणि जानराव वाबळे यांच्यावर बुर्हाडी घाटाची जबाबदारी सोपवली , अब्दालीच्या सैन्याच्या तिखट मार्यापुढं जानराव पडल्याची बातमी आली तशी मराठ्यांचा रणमर्द वाघ खवळतच बुर्हाडी घाटावर सपासप तलवारी ने गिलचे कापत थयथयाट करायला लागला. दत्ताजी शिंद्यांचं अतुलनीय शौर्य बघून नजिबखान रोहिल्या आणि खुद्द अब्दालीदेखील मनातून घाबरले होते. नजीबखानाने कुटीलतेनं बंदुकधार्याला दत्ताजीवर नेम धरायला लावून दत्ताजींच्या छातीत गोळ्या घातल्या.दत्ताजी जमिनीवर कोसळले. त्यांना जमिनीवर पडलेलं बघून नजीब आणि कुतूबशाह प्रचंड आनंदी झाले. ते दत्ताजींजवळ आले. यावेळी कुतुबशाहने दत्ताजींना “क्यों पाटील… और लढोंगे?”, असा प्रश्न विचारला. यावर लगेच दत्ताजींनी निडरपणे “क्यों नही? बचेंगे तो औरभी लढेंगे”, असं उत्तर दिलं. आणि आजही दत्ताजींचे हे शब्द लाखो जीवांना रणमर्दानी कैफ काय असतो याचं उदाहरण दाखवून देतात.
दत्ताजी पडल्याची बातमी पेशवाईत पोचली आणि पडघम वाजलं भारतातील सर्वात मोठ्या मोहिमेचं ! दिल्ली मोहिम – परिपत्य घुसखोर अहमदशाह अब्दाली आणि त्याला बोलावणार्या नजिबखान रोहिल्याचं !

पानिपतच्या तिसर्या युद्धाची पार्श्वभूमी लेखक विश्वास पाटलांनी ज्या शब्दांत मांडली त्यावरुनच वाचकांना कळतं की इतिहासाला कलाटणी देणाऱ हे महायुद्ध नेमकं घडलं का ? पार्श्वभूमी पासून सुरू झालेला प्रवास त्याकाळातील छत्रपती शाहूमहाराजांच्या अधिपत्याखालील साम्राज्य , पेशवाईचंं महत्व , शनीवारवाडा आणि इतर मराठा सरदारांच्या बाबतीत पेशवाईचं धोरण इ. बाबतीत लेखक विश्वास पाटलांनी सचित्र वर्णन केलं आहे. ओघवती भाषा शैली , खिळवून ठेवणारे प्रसंग , वाचकांना गुंतवून ठेवणारी मांडणी याद्वारे लेखक शब्दाशब्दावर सरस ठरतात.
दिल्ली मोहिमेची तयारी , पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका , खर्चाची तरतूद इ. गोष्टीद्वारे पेशवाईत असलेली अंतर्गत धुसफूस वाचकांना जाणवून येते. एवढ्या मोठ्या मोहिमेत बाजारबुणगे , कुटुंब कबीला , तिर्थक्षेत्रास जाण्यासाठी येणारे भाविक या सर्वांचा विचार करुन सदाशिवराव पेशवा यांची रणनीती वेगळाच ठाव घेते. एवढं लटांबळ मागे आलं तर गतिमानतेवर होणारा परिणाम भाऊसाहेब पेशव्यांना व्यथित करतो. एवढी मोठी मोहीम , एवढा दांडगा पसारा आणि या सर्व गोष्टींवर होणारा मोहिमेचा खर्च त्याची तजवीज इ. बाबी पेशवाईतील काही उणीवांवर अचूक बोट ठेवतात. मोहिमेतील निघालेले लढवय्ये समशेर बहाद्दर , जनकोजी शिंदे, इब्राहिम खान गारदी, अंतर्वेदीतील गोविंद पंत बुंदेले , मल्हारराव होळकर या प्रत्येकाच्या नजरेतून मोहिमेचं एक वेगळंच महत्व होतं. मजलदरमजल करत मराठ्यांची मोहीम निघाली आणि जसे दिवस पुढं जात होते तशी या मोहिमेची दाहकता जाणवू लागली . उत्तरेतला पावसाळा जीव कंठाशी आणत होता यमुनेला उतार येत नव्हता. पूल बांधण्यासाठी गोविंद पंताशिवाय एकही सरदार कामी येत नव्हता एकना अनेक अडचणी मराठ्यांच्या पुढं आ वासून उभा होत्या याऊलट अब्दालीकडे असणारी ताज्या दमाची फौज , उत्तरेतल्या वाटा आणि वार्याचा फौजेला असलेला अनुभव , मुबलक रसदेची उपलब्धता , शुजा उद्द्दौलासह अनेक राजा आणि संस्थानिकांची साथ अब्दालीचं पारडं जड करत होती. यमुनेच्या उताराची वाट बघत बघत मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत आला होता शेवटी सर्वानुमते कुच करायचं ठरलं आणि मराठ्यांनी दिल्लीवर हल्ला करायचं निश्चित केलं. दिल्लीवर हल्ला केला दिल्ली जिंकली तसं मराठ्यांना चेव चढला आणि एक वेगळीच कैफ मराठा सैन्यात आली. दिल्ली दरबारातील छत तोडून त्यातून केलेल्या विक्रीतून मराठा सैन्याचा खर्च भागवण्याची आलेली नामुष्की या मोहिमेचा खर्च आणि त्याची दाहकता स्पष्ट सांगून जाते.

काला आम, सोनपत जिंकत मराठे कुच करत होते आणि अब्दालीनं देखील तयारी केली होती मराठा फौजेला चारीमुंड्या चीत करण्याची ! दोन्ही फौजेतील सर्वसामान्य सैनिकांची मोहिमे बद्दलची विचारसरणी लेखकाने काही संवादातून उत्कृष्टपणे मांडली आहे. कडाक्याचा पाऊस त्यामुळे पसरलेली रोगराई , दोन्हीकडील सैन्याचे होणारे हाल वाचून वाचक गलबलून जातात. मराठा सैन्याची होणारी उपासमार आणि तरीही जपला जाणारा लढाऊ बाणा या मातीच्या पराक्रमाची महती सांगतात. पोटात अन्नाचा कण नसतानाही लढाईच्या आदल्या रात्री सर्व लढवय्या नेतृत्वांची झालेली बैठक आणि सर्वसामान्य फौजेचा लढवय्या बाणा अंगावर काटा उभा करतो.
लढाईच्या दिवशी सर्वात आघाडीवरील मोर्चा सांभाळणारं इब्राहिम खान गारदीच्या नेतृत्वाखालील तोफखान्याचं कर्तृत्व मागच्या घोडदळ आणि पायदळाला कशा प्रकारे संरक्षीत कर होतं याचा नजारा बघत अब्दाली आणि नजिबखान अवाक झाले होते. दुर्दैवाने मराठा सैन्याला संयम ठेवता आला नाही आणि ठरवलेली सैन्यरचना मोडत घोडदळ आणि पायदळ पुढं निघालं त्यामुळे झालेला गोंधळ शेवटपर्यंत सांभाळताच आला नाही आणि हल्लकल्लोळ माजला. फक्त तलवारींचा खणखणाट आणि लढणाऱ्या योद्ध्यांचा गदारोळ याशिवाय पानिपतच्या त्या मैदानावर कुठलाच आवाज येत नव्हता. अंबारीत बसलेले विश्वासराव दिसेनासे झाले म्हणून बेभानपणे लढणारा सदाशिवराव भाऊ पेशवा म्हणजे साक्षात सांब सदाशिवाचा अवतारच भासत होता. जनकोजी शिंद्यांचा पराक्रम तलवारीच्या धारदार पात्यासारखा खणखणत होता. लढाईचा प्रसंग वाचताना वाचकांच्या मनाचा आणि मेंदूचा ताबा लेखकाच्या प्रत्येक शब्दानिशी जाणवतो.
ही फक्त जय पराजयाची लढाई नसून मराठा साम्राज्याच्या नरसिंहांची पुढच्या दहा वर्षातील पराक्रमाची नांदी ठरली याचं चित्रण विश्वास पाटलांनी अप्रतिम रित्या सादर केलं आहे.

सुदैवाने म्हणता येईल किंवा योगायोगाने ही कादंबरी वाचण्याचा योग १३ जानेवारीच्या रात्रीच आला. रात्री १०-३० वाचता सुरु केलेलं वाचन १४ जानेवारीच्या पहाटे ४-२० पर्यंत चालू होतं , जेव्हा पूर्ण वाचन झालं आणि मोबाईल मध्ये वेळ बघितला त्यावेळी दिसलेली तारीख मनात एक घालमेल करुन गेली. असं म्हणतात की पानिपतात अख्खी एक पिढी खर्ची पडली आणि मराठ्यांचं भरुन न येणारं नुकसान झालं ; पण लेखकाने मांडलेली परिस्थिती आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपल्याला पानिपतातील पराभव हा पराभव नसून राष्ट्र रक्षणासाठी मराठ्यांनी दिलेली आहुती असल्याचं अधोरेखित करतात.
कादंबरीतील प्रत्येक शब्द ना शब्द वाचकांना मोहित करणारा आहे तर आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष मांडणारा आहे तसेच प्रासंगिक चित्रे देखील कादंबरीचा उच्च दर्जा अधोरेखित करतात. मुखपृष्ठावरील हाडामांसाचा चिखल, मावळतीचा सुर्य, आकाशातील काळे ढग मराठा सैन्याच्या पिछेहाट होत असताना भाऊराव पेशव्यांनी उगारलेल्या भाल्याचं चित्र मागील तीसपेक्षा जास्त वर्षांत हे पुस्तक आघाडीवर का आहे याचं सुचक सांगतात.

प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या लेखक विश्वास पाटलांचा अभ्यास, विषयावरील संशोधन, पुराव्यानिशी केलेली मांडणी आणि संदर्भसूची वाचकांना मार्गदर्शक ठरते.

Leave a Reply