चाळीशी !
प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील एक अव्यक्त असणारा वयाचा आकडा !
तरुण म्हणावं तर तारुण्याच्या सुलभ स्वप्नांचा केव्हाच पाठलाग सोडलेला असतो , वयस्कर म्हणावं तर अजूनही आयुष्यातील पुर्ण करायच्या गोष्टींची यादीच संपलेली नसते . म्हणावं तर अवखळ म्हणावं तर सर्वात समंजस असं वय ! तरुण असताना काय करावं नी काय नको असं झालेलं असतं तर म्हातारपणात काय काय करायचं राहीलं याची गोळाबेरीज आपण करत असतो तर चाळीशी म्हणजे मानवी आयुष्याचा सुवर्णमध्य म्हणता येईल असं वय ! आईवडील , कुटुंब , नोकरी-व्यवसाय हीच प्रायोरिटी झालेलं पुरुषी वय तर या सर्वांना एका धाग्यात गुंफून समतोल साधणारं स्त्री चं वय ! आयुष्याच्या सर्वात सुंदर आणि समंजस टप्प्यावर प्रत्येक जीवाला घेऊन जाणारं वय म्हणजे चाळीशी . याच वयातील मनस्वी तरुणांची पोक्त विचारांच्या जबाबदार मध्यमवयीन स्त्री पुरुषाची कहाणी म्हणजे ‘बियॉंड सेक्स’ ही कादंबरी !
बियॉंड शब्दातूनच लेखिकेनं पलिकडंचं जग मांडलं आहे. पलिकडे कशाच्या तर सेक्सच्या ; आजही सेक्स हा शब्द लिहीला वाचला बोलला किंवा ऐकला तरी कपाळावर आठ्या पडल्याशिवाय राहत नाहीत. इथे तर मराठी भाषेत लिहीलेली कादंबरी आहे ; पण नाव आणि आतली कलाकृती याचा शब्दशः संबंध नाही . सुखवस्तू , कलेची, लिखाणाची आवड असणारी ती , तिच्या प्रत्येक गोष्टीचा , लिखाणाचा , वागण्याचा किंबहुना तिच्या असण्यानं ज्याला स्वतःचं अस्तित्व जाणवतं ‘तिचा नवरा’ , अशाच कुठल्याशा मित्राच्या माध्यमातून ओळख झालेला तिचा मित्र ‘तो’ आणि प्रत्येक जबाबदारीतून त्याला साथ देणारी , जिवापाड प्रेम करणारी मित्राची बायको ‘ती’ या सगळ्यांचं ‘बियॉंड सेक्स’ नातं सांगताना लेखिकेनं लिखाणाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ही उंची प्रत्येक वाक्यावाक्यातून एका स्त्री पुरुषाला एकत्र आणते आणि तेवढ्याच ताकदीनं दोन्ही जोडप्यांना आपापल्या नात्यापासून दुरावू देत नाही.
तिचं पहिलं प्रेम म्हणा जीवन म्हणा किंवा श्वास म्हणा म्हणजे ‘समीर’ तर तिच्या लिखाणाचा चाहता असणारा , तिच्या शब्दाशब्दात हरवून जाणारा ‘सागर’ दोघांच्याही नावाच्या सुरुवातीचं आद्याक्षर सारखंच तसंच तिचं मिराचंही दोघांवरती असणारं निखळ प्रेम ही सारखंच ! समीरच्या आयुष्यात श्वासाइतकंच महत्व तर सागरच्या आयुष्यात क्षणाक्षणांची साथ निभावणारी जोडीदार ती ! सागरच्या आयुष्यात जिथे ‘मिरा’चा (र संपतो) रोल संपतो तिथंच ‘राधे’चा (र सुरु होतो) सुरु होता. मीरा आणि सागरच्या निरपेक्ष , वासनारहीत
प्रेमाची गोष्ट फुलतेच मुळात त्यांच्या जोडीदारांच्या त्यांच्यावर असलेल्या विश्वासाच्या बळावर ! समीर तसा नसता किंवा राधा तशी नसती तर निश्चीतच ‘बियॉंड सेक्स’ ची कलाकृती एकढ्या उंचीवर गेलीच नसती.
आजकाल पती पत्नीचं नातं कितपत विश्वासाच्या धाग्यावर टिकून आहे ? या धकाधकीच्या आणि तणावाच्या जीवनात काळ वेळ जपायला जमत नाही तिथे विश्वास ठेवायला आणि जपायला कुठून जमेल , अशी अवस्था आहे . लेखिकेने ज्या पद्धतीने ही कलाकृती घडवून आणली आहे त्यानंतर प्रत्येक वाचकांच्या मनात आपापल्या समीर आणि राधेविषयी निश्चितच वेगळ्या दृष्टीने विचार करायची गरज निर्माण होईल. या कादंबरीचं समीक्षण वाचण्यापेक्षा कादंबरी वाचणं ही वाचकांसाठी पर्वणी असेल.
खूप काही वाचलं होतं लेखिका सोनल गोडबोले यांच्या या कादंबरीविषयी ! पण म्हणतात ना स्वर्ग पाहायचा तर जीव द्यावाच लागतो तसंच ही कलाकृती अनुभवायची तर नक्की स्वतःहून जोडीनं वाचा !