You are currently viewing Father Of Modern Spyverse – बहिर्जी नाईक
Book review - Bahirji naik

Father Of Modern Spyverse – बहिर्जी नाईक

‘इतिहास’ हा फक्त शब्द आहे का ? फक्त शाळेपुरता एक विषय आहे का ? मिरवण्यापुरता झेंडा आहे का ? असे असंख्य अगणित प्रश्न इतिहासावर नेहमीच पडतात. इतिहास म्हणजे सनसनावळ्या, इतिहास म्हणजे लढाया आक्रमणं , इतिहास म्हणजे कोणता राजा कधी जन्मला , किती युद्ध झाली , कधी झाली ; नेमकं इतिहासाला मांडायचं कसं ? जेंव्हा कधी ‘इतिहास’ हा शब्द आपण वाचतो-बोलतो-लिहीतो सर्वात प्रथम ‘शिवछत्रपती’ डोळ्यासमोर उभे राहतात. महाराष्ट्रातील जन्मलेल्या कोणाही व्यक्तीला शिवशंभुछत्रपतींचा इतिहास सांगावा लागत नाही. ‘शिवशंभुछत्रपती’ हा शब्द जन्मासोबतच प्रत्येकाच्या माथी कोरुनच नियती जन्माला घालते असं वाटतं.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या फक्त इतिहासातील व्यक्ती नाहीत तर मानवी मूल्यांच्या सर्वोच्चतेचं परिमाण आहेत. ‘स्वराज्य’ या संकल्पनेचा मागोवा घेताना छत्रपतींचं कर्तृत्व नेमकं घडलं कसं असेल ? छत्रपतींचा एक एक मावळा म्हणजे राष्ट्रीय चारित्र्यच ! हे राष्ट्रीय चारित्र्य उभा राहण्यामागे कोणती प्रेरणा काम करत असेल ? घरादारावर तुळशीपत्र ठेवून महाराजांच्या शब्दाखातर का हजारो मावळे स्वराज्यावर कुर्बान करते झाले ? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीला असामान्यत्व देणारी राष्ट्रीयत्वाची भावना हीच दिशादर्शक ठरते !


शिवकाळातील अशाच एका राष्ट्रीय चारित्र्याबद्दल नुकतीच एक कादंबरी < ऐतिहासिक कलाकृती वाचनात आली ज्या कलाकृतीतून शिवरायांवर सर्वस्व अर्पण केलेल्या, स्वराज्यासाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या धगधगत्या अग्नीज्वालेची जडणघडण तसेच इतिहासात कुठेच उल्लेखित नसलेल्या समरांगणाची गौरवगाथा तेवढ्याच ताकदीच्या शब्दज्वाळांनी लेखकाने मांडलेली आहे. या सह्याद्रीच्याच नव्हे तर सबंध भारतभूमीच्या कुशीत आपल्या कार्यकर्तृत्वाने अजरामर ठरलेली इतिहासाने न गायलेली गाथा म्हणजे Father of modern spyverse म्हणजेच आधुनिक गुप्तहेर खात्याचे जनक – बहिर्जी नाईक !

शिवछत्रपतींच्या प्रत्येक पावलाच्या आधी त्या पावलांची निर्धोकता घडवण्याचं काम करणारा अष्टपैलू कारागिर म्हणजे स्वराज्य गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक ! आजपर्यंत इतिहासाला देखील ज्यांच्या कार्यशैलीने अचंबित केलं अशा हिमालयाहूनही उत्तुंग व्यक्तीमत्वा बद्दल लिहायची मर्दुमकी डॉ.राज जाधव यांनी लिलया पार पाडली आहे. मराठी साहित्य विश्वात ऐतिहासिक कादंबरी म्हटलं की कल्पोकल्पित, रसभरित वर्णनांनी सजवलेली शब्दरचना ही ओळख या कलाकृतीनं मोडित काढली आहे. वाक्यावाक्यातून लेखकाने जे शब्द पेरले आहेत त्यातून तळपतो तो गुप्तहेर खात्याचा प्रेरणादायी प्रवास, ६८० पानांच्या या कालसफर प्रवासात कुठेही अवाजवी शब्द मांडणी वाटत नाही ना कुठे अतिशयोक्ती वाटत नाही

‘एखाद्या गुप्तहेराचं यश हे इतिहासात त्या गुप्तहेराबद्दल किती लिखाण झालं आहे यावरून ठरतं , भरमसाठ लिखाण असेल तर गुप्तहेर कुचकामी ठरतो तर इतिहासाला पुसटसा माहिती असणारा गुप्तहेर यशस्वी ठरतो’ हे स्पष्टीकरणंच बहिर्जी नाईकांचं कार्यकर्तृत्व सांगायला पुरेसे आहे. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना वाचकांना त्या काळात फिरवून आणण्याचं कसब हे त्या कादंबरीकाराच्या लिखाणाचं यश म्हणता येईल, यानुसार ही ६८० पानांची कादंबरी वाचकांना फक्त फिरवून आणत नाही तर तो धगधगता ऐतिहासिक काळ जगवते.

जेजुरीच्या खंडोबाचा प्रसाद म्हणून जन्मलेलं एक पोर जे जन्मत:च बापाला पोरकं होतं , जगण्याच्या धुमश्चक्रीत स्वतः ला टिकवत ठेवत पावलापावलावर संघर्षाचा ओरखडा घेऊन नियतीशी लढा देत खंडोजी म्हणून कसा उभा राहतो , उभा राहिलेला बाल खंडोजी स्वतःला स्वतःच घडवत काळाशी लढा देत कार्यकर्तृत्वाच्या कसोटीवर सज्ज होत एक कथाकवनाचा खेळ बघतो काय अन् स्वतःला शोधत शोधत अगणित कला सोंग विद्या शास्त्र शिकतो काय अन् आपल्या समोर बहिर्जी म्हणून उभा राहतो काय अन् स्वराज्याच्या प्रत्येक पावलांची पुर्वतयारी बनतो काय हा रंजक प्रवास अनुभवण्यासाठी डॉ.राज जाधव लिखीत बहिर्जी नाईक (पुर्वार्ध) ही कादंबरी प्रत्येक वाचकानं किमान एकदा तरी नक्कीच वाचली पाहिजे नव्हे जगली पाहिजे.

या कादंबरीची रचनाच मुळात वेगळी आहे, जे ऐतिहासिक पात्र आजवर आपण केवळ वाचली होती , टीव्ही चित्रपटात पाहिली होती अशी इतिहासाला कलाटणी देणारी पात्रं जिवंत होऊन वाचकांना आपली वाटचाल (पात्रांच्या दृष्टीकोनातून) गौरवगाथा (वाचकांच्या दृष्टीकोनातून) स्वतः सांगत आहेत. खंडोजी ते बहिर्जी नाईक हा प्रवास स्वतः बहिर्जी, छत्रपती शिवराय, गुप्तहेर खात्यातील इतर पात्रे यांच्या तोंडून समजून घेताना एक वेगळीच अनुभूती येते. गुप्तहेर खातं का निर्माण केलं गेलं , कसं निर्माण केलं गेलं, या खात्याची रचना कशी होती , करपल्लवी भाषा कशी होती या आणि अशा अंगावर शहारे आणणार्या ऐतिहासिक संकल्पनाची लेखकाने मांडलेली उकल अचंबित करणारी आहे. डॉ राज जाधव यांचं सहजसोपं लिखाण वाचकांना किचकट वाटणार्या ऐतिहासिक संकल्पना आणि घटना देखील सहज कोसळणाऱ्या पावसासारख्या भासतात. पहिलं पान वाचलं की ६८० पानापर्यंतची जितीजागती ऐतिहासिक सफर कधी संपते हे कळतच नाही आणि उत्सुकता लागते ती उत्तरार्धाची !


इतिहासातील प्रत्येक शब्द घटना एकमेकांशी कशा प्रकारे बांधलेल्या होत्या हे कादंबरीतून सहजरीत्या लक्षात येते. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणार्या प्रत्येक लढाईचे , पावलाचे, राजकीय मुत्सद्दीगिरीचे अस्खलित वर्णन अतिशय समर्पक शब्दांत लेखकाने केले आहे. शिवइतिहासात डोकावताना जे कोपरे आपल्या नजरेच्या टप्प्यातून सुटलेले आहेत त्या कोपर्यांना डोळ्यासमोर उभा करण्याचं काम ही कादंबरी करते . या बेलाग बेदरकार सह्याद्रीच्या कडे कपारीत घडलेल्या इतिहासाला आधुनिक पिढीसमोर मांडण्याचं अतुलनीय काम लेखकाने केलं आहे जे की बहिर्जी नाईकांच्या कार्यकर्तृत्वाचा उत्तरार्ध मांडल्याशिवाय अपूर्ण आहे.

बहिर्जींचा धगधगता इतिहास उत्तरार्धात कसा होता हे सांगणारा या कादंबरीचा उत्तरार्ध भाग लवकर आणावा हीच लेखक आणि प्रकाशकांना विनंती !!!

विजय गोपाळराव पवार
लेखक- बाराखडी उद्योजकतेची

This Post Has 3 Comments

  1. Sudarshan Nanasaheb patil

    👌

  2. Prakash dhoke

    मला ही कादंबरि पाहिजे

    1. Vijay Pawar

      सदरील कादंबरी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मागवू शकता.

Leave a Reply