You are currently viewing महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री

सारीपाट सत्तेचा

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ चालू आहे त्या कथानकावर चित्रपट बनवला तर सुपरडुपर हीट होईल अशी परिस्थिती आहे ; नाही म्हणायला वेबसिरीज आलीच होती प्रेक्षकांनी देखील आवडीने पाहिली. या सत्तेच्या सारीपाटाचा विचार करता आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्वच मुख्यमंत्र्यांचा लेखाजोखा !

भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४.१ नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतो. सध्याच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात खरी मेख राज्यपालापासूनच सुरु होते. पहाटेच्या शपथविधी पासून सुरू झालेला प्रवास एकाच पक्षाचे दोन गट पाडून सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत सरकार बनवण्यात झाला.

आजच्या या लेखात आतापर्यंतचे मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांनी राबवलेले महत्त्वाचे प्रकल्प याबद्दल जाणून घेऊ वाचकमित्र कडून.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून बाळ गंगाधर खेर यांनी इ.स. १९४७ ते १९५२ या कार्यकाळात जबाबदारी पार पाडली.
यानंतर
इ.स. १९५२ ते १९५६ याकाळात मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते यशवंतराव चव्हाण १९५६ ते १९६० याकाळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते.

भाषावार प्रांतरचने आधारित मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांनी कार्यकाळ पार पाडला ते खालीलप्रमाणे

१) यशवंतराव चव्हाण – १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री पद भूषविले असे देशाचे माजी संरक्षणमंत्री, द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज योजना, कसेल त्याची जमीन, पाटबंधारे व उद्योग विकासासाठी मंडळ, मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

सहकारी साखर कारखान्यांचे जाळे विणण्यात यशवंतरावांचा मोठा वाटा आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्राच्या पंचवार्षिक योजनांचा आणि पानशेत धरण्याच्या बांधणीचा प्रारंभ यशवंतरावांच्या काळातच झाला.

२) मारोतराव कन्नमवार- २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३

पडेल ते काम करत अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारे मारोती कन्नमवार हे वर्षभर या पदावर होते. त्यांच्या कार्यकाळात ओझरचा मिग विमान प्रकल्प, वरणगाव-भंडारा-भद्रावती या ठिकाणांवर संरक्षण साहित्य उत्पादन प्रकल्प सुरू झाले. कापूस एकाधिकार खरेदी योजनाही मारोतरावांच्या कार्यकाळातच सुरू झाली.

३) पी. के. सावंत –
२५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३

महाराष्ट्राचे पहिले हंगामी मुख्यमंत्री म्हणून अवघ्या दहा दिवसांसाठी सावंतांनी कार्यभार सांभाळला होता.
कन्नमवारांचे निधन ही घटना सावंतांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी कारणीभूत ठरली.

४) वसंतराव नाईक –
५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५

सर्वाधिक ११ वर्षे २ महिने १८ दिवस मुख्यमंत्री पदावर राहत विक्रम घडवणारे वसंतराव नाईक हे व्यक्तीमत्व खरे कार्यसम्राट मुख्यमंत्री ठरतात. त्यांच्या काळात ग्रामीण रोजगार हमी योजना, गरिबी हटाओ योजना, धवलक्रांती, हरित क्रांती, लॉटरी सुरू करण्याचा निर्णय, गाय आणि म्हैस यांच्या दुधाला एकच भाव असे अनेक निर्णय झाले. वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळातच महाराष्ट्र धान्य आणि दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

५) शंकरराव चव्हाण –
२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७

हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे शिस्तप्रिय मुख्यमंत्री म्हणून शंकररावांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. मराठवाडा विभागातील पहिले मुख्यमंत्री बनलेल्या शंकररावांनी सरकारी फायली कार्यालयाबाहेर नेण्याला प्रतिबंध घातला. आदिवासींच्या जमिनी संरक्षण, पंचवार्षिक योजनांतील वीस कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, भिकारी हटाव योजना, अशा योजना शंकररावांच्या कार्यकाळात प्रभावीपणे अंमलात आणल्या गेल्या. मराठवाड्याला प्राणदायी ठरलेला जायकवाडी धरण प्रकल्पही शंकररावांच्या कार्यकाळातच सुरू झाला.

६) वसंतदादा पाटील –
१७ एप्रिल १९७७ ते १७ जुलै १९७८

प्रशासकीय सोयी आणि राजकीय गोंधळ शमविण्यासाठी कॅबिनेट मंत्रीमंडळात संख्यावाढ करण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून वसंतदादा ओळखले जातात. दूध उत्पादनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाची नाडी सांभाळणार्या संस्था सहकारी क्षेत्रात आणून सहकार क्षेत्राला बळकटी करण्याचं महत्वपूर्ण कार्य वसंत दादांनी केले. बोनस कायद्यात सुधारणा झाली. मुंबईसाठी रेल्वे विकास प्रकल्प, झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा देण्याची योजना, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची योजना यांच्याच कार्यकाळा दरम्यान सुरू झाली.

७) शरद पवार –
१८ जुलै १९७८ ते १६ फेब्रुवारी १९८०

बहुचर्चित पुलोद चा प्रयोग करत शरद पवार मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले.
महिला सक्षमीकरण धोरण, राज्याचे क्रीडा क्षेत्र धोरण, गळीत हंगामाच्या काळाची निश्चिती, महाविद्यालय समान फी निर्णय यांसारख्या अनेक लोकोपयोगी योजना आणि निर्णय याकाळात घेण्यात आले. कृषी संशोधन, सहकार क्षेत्र सक्षमीकरण आणि औद्योगिक विकास यासाठी अनेक प्रकल्पही राबवण्यात आले.

८) अब्दुलरहेमान अंतुले –
९ जून १९८० ते २० जानेवारी १९८२

महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर ए.आर.अंतुले पदावर आले. सध्याचे संभाजीनगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचं त्यांनी विभाजन केलं. कुलाबा जिल्ह्याचं नाव बदलून रायगड असं करण्यात आलं. प्रत्येक तालुक्यात हुतात्म्यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. लातूर, सिंधुदुर्ग आणि जालना या तीन जिल्ह्यांची निर्मितीही त्यांच्याच काळात झाली. चार लघुबंदरांच्या विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले. मानखुर्द-नवी मुंबई हा रेल्वे प्रकल्पही सुरू झाला. अंतुलेंनी त्यांचा कार्यकाळ धडाकेबाज निर्णय घेत गाजवला.

९) बॅरिस्टर बाबासाहेब भोसले –
२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३

मंत्र्याच्या पगारात कपात करत स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ करणारे मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांनी छाप पाडली. श्रमजीवी कुटुंब योजना, मच्छिमारांसाठी विमा योजना , गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, सध्याचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना, कोल्हापूरमध्ये चित्रनगरी उभारणी यासारखे राज्याला प्रगतीपथावर नेणारे कार्य याकाळात घडले.

१०) वसंतदादा पाटील –
२ फेब्रुवारी १९८३ ते ९ मार्च १९८५

सहकार चळवळ ही सर्वसामान्यांची चळवळ बनवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत सहकार चळवळीचा पाया मजबूत केला. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी सोसायट्यांची निर्मिती, बाजार समित्यांची स्थापना याद्वारे शेतकरी सक्षमीकरणाचे कार्य करण्यात आले. विनाअनुदानित तत्वावर शिक्षण संस्थाही राज्यात सुरू झाल्या.

११) वसंतदादा पाटील –
१० मार्च १९८५ ते २ जून १९८५

शेतकरी कर्ज वाटप करतानाच थकबाकी माफीचा विचारही करण्यात आला. याच काळात राज्याच्या वीज उत्पादनात ८.५५ टक्के वाढ झाली. उसाच्या खरेदी दराची निश्चिती झाली.

१२) डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर –

३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६

पहिली ते बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय निलंगेकरांनी घेतला. आतापर्यंत विकासाच्या वाट्यापासून दुर्लक्षित असणार्या विदर्भ, कोकण, मराठवाडा विकासासाठी विशिष्ट कार्यक्रम आखण्यात आले. खेडोपाडी दूरदर्शन संचाचं वाटपही केलं. राज्याच्या पर्यावरण विभागाची निर्मिती करत वीजपुरवठ्यातही वाढ केली.

१३) शंकरराव चव्हाण – १४ मार्च १९८६ ते २४ जून १९८८

हेडमास्तरांनी आपली दुसरी टर्म देखील नावाजलेली ठरवली. राज्यात शुन्यावर आधारित अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली. रेल्वे रुंदीकरण करत जवाहर योजनाही लागू केली.

१४) शरद पवार – २५ जून १९८८ ते ३ मार्च १९९०
शेतकऱ्यांची कर्ज माफी, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णयही याच कालावधीत घेण्यात आला. लघुउद्योगांना सवलती देत औद्योगिक विकासासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात आले.

१५) शरद पवार –
४ मार्च १९९० ते २४ जून १९९१

या कार्यकाळात कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले.कृषी विद्यापीठातल्या संशोधनाला मदत, तेलबिया, अन्नधान्य आणि ऊस उत्पादन वाढीसाठी खास प्रकल्प योजना राबवण्यात आल्या.

१६) सुधाकरराव नाईक –
२५ जून १९९१ ते ५ मार्च १९९३

महिला आणि बालकल्याणासाठी स्वतंत्र विभाग तयार करत सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. १२ वर्षांत प्रथमच जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेण्यात आल्या.

१७) शरद पवार – ६ मार्च १९९३ ते १३ मार्च १९९५
लातूरचा प्रलयंकारी भूकंपानंतर पुनर्वसनाचे कार्य हातात घेत यशस्वीपणे पार पाडणारे शरदराव विशेष लक्षणीय ठरले.
मुंबई बॉम्बस्फोटानंतर परिस्थिती समर्थपणे सांभाळली,महिलांविषयची धोरण राबवत संरक्षण खात्यात महिलांचा प्रवेश झाला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली सोबतच शेती उत्पादनाच्या प्रक्रियांना प्रोत्साहन देत पाणी वापराच्या नव्या तंत्रांचा विकास करण्यावरही भर देण्यात आला.

१८) डॉ. मनोहर जोशी –
१४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९

राज्याचं नवं शैक्षणिक धोरण,महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचा प्रकल्प, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, यासारखे अनेक लोकोपयोगी उपक्रम याकाळात पार पडले. मुंबईत उड्डाणपूल उभे राहिले, तर एक रुपयात झुणका-भाकर या प्रकल्पाची अंलबजावणीही झाली.

१९) नारायण राणे –
१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९

बळीराजा संरक्षण योजना आणि जिजामाता महिला आधार योजना राबवण्याची सुरुवात झाली. निवृत्तीचं वय ६० वरुन ५८ करण्यात आलं. राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पाटबंधारे, रस्ते-विकास, कृष्णा खोरे, वीज निर्मिती या प्रकल्पांमध्ये खाजगी कंपन्यांची मदत घेण्यात आली. १९९९ हे वर्ष माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करत सर्व जिल्हे इंटरनेटच्या माध्यमातून मंत्रालयासोबत जोडण्यात आले.

२०) विलासराव देशमुख –
१८ ऑक्टोबर १९९९ ते १७ जानेवारी २००३

अनावश्यक नोकरभरती टाळत राज्याच्या खर्चावर मर्यादा आणली, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान असे महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले. मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय झाला. समिती स्थापन करुन झालेल्या संशोधनाच्या आधारे १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय याचकाळात झाला.

२१) सुशीलकुमार शिंदे –
१८ जानेवारी २००३ ते ३१ ऑक्टोबर २००४

माहितीच्या अधिकाराचा कायदा, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विकास मंडळ, विदर्भासाठी ७६९ कोटी रुपये खर्चून रस्ते आणि कालवे बांधण्याचा प्रकल्प मंजूर झाला. मुंबईच्या विकासात नवीन अध्याय जोडण्याचं काम याकाळात झाले.

२२) विलासराव देशमुख –
१ नोव्हेंबर २००४ ते ७ डिसेंबर २००८

आर आर आबांच्या पुढाकारानं डान्स बार बंदीचा महत्वपूर्ण निर्णय याचकाळात घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात आलं. नवं गृहनिर्माण धोरण, वीस लाख रोजगार निर्मिती करत, माहिती तंत्रज्ञान शिक्षणावर भर देण्यात आला. महत्त्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाच्या विकासासाठी कंपनी स्थापन करण्यात आली.

२३) अशोक चव्हाण –
८ डिसेंबर २००८ ते ७ डिसेंबर २००९

विलासरावांच्या राजीनाम्यानंतर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्य सुरक्षा परिषदेची स्थापना, पुण्यात गुप्तचर प्रशिक्षण केंद्राची उभारणी, सहावा वेतन आयोग, यासारखे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आले. पन्नास हजार कोटींची व्यवस्था करुन राज्यात दळणवळण मार्ग उपलब्ध करण्यात आले. ४० लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी तरतूद करण्यात आली.

२४) अशोक चव्हाण –
७ डिसेंबर २००९ ते ११ नोव्हेंबर २०१०
बेस्ट ऑफ फाईव्ह धोरण, विकासाच्या वाट्यापासून वंचित असलेल्या उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली.राजीव गांधी सागरी सेतूचं काम पूर्ण झालं.

२५) पृथ्वीराज चव्हाण – ११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४

या सरकारच्या काळात महिला आरक्षणात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं. मोनो आणि मेट्रो रेल प्रकल्पांना, ई-प्रशासन धोरणाला गती मिळाली.

२६) देवेंद्र फडणवीस –
३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९

समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना, मेट्रो प्रकल्प हे प्रकल्प राज्याच्या विकासात भर टाकणारे ठरले. थेट जनतेतून सरपंचांची निवड घेण्याचा निर्णयही या सरकारनं घेतला. विधानसभेत लोकसेवा हक्क कायदा मंजूर करण्यात आला. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमीपूजन करण्यात आलं.

२७) देवेंद्र फडणवीस –
२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
पहाटेचा शपथविधी सोहळा चांगलाच चर्चिला गेला. राज्याच्या इतिहासात प्रथमच एवढं सनसनाटी वादळ उठलं आणि अवघ्या तीन दिवसांत हे सरकार कोसळलं.

२८) उद्धव ठाकरे –
२८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२

यानंतर आधीच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेना पक्षातील काही आमदार फुटून बीजेपी सोबत जात नवीनच सत्तासमीकरण मांडून श्री एकनाथ शिंदे हे ३० जून २०२२ पासून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

या सत्ता सारीपाटाच्या काही मनोरंजक गोष्टी खालीलप्रमाणे –

-१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

-२८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

-१२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९ या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

 

वसंतराव नाईक हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले, सोबतच त्यांनी सर्वाधिक ११ वर्ष ७८ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं.
-त्यांच्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला तसेच सर्वात कमी काळ म्हणजे अवघ्या तीन दिवसांचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे पद भूषविले.
-शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले, त्यांनी ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

-आतापर्यंत २० जणांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची भूषवली आहे.
विशेष म्हणजे स्त्रियांना राजकीय आरक्षण देणार्या महाराष्ट्राला आजवर महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही.

-आत्तापर्यंत सर्वाधिक मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 50 वर्षे मुख्यमंत्रिपद हे काँग्रेसकडे होते. तसेच आतापर्यंत विदर्भातून चार मुख्यमंत्री निवडले गेले, तर सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणजेच सहा मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातून निवडण्यात आले होते.
-राज्यात शंकराव चव्हाण अशोकराव चव्हाण हे पिता-पुत्र मुख्यमंत्री होऊन गेले आहेत.

© वाचकमित्र

This Post Has 5 Comments

  1. Pallavi

    Very nice information

  2. Deepak Ankushrao Suryawanshi

    एक नंबर सर❤️❤️

  3. Sudarshan patil

    अतिशय अभ्यासपूर्ण अणि स्पर्धा परिक्षेसाठी महत्वाची माहिती…

  4. Nayana B.

    छान माहिती सर

  5. Rajesh Kapase

    अत्यंत उपयुक्त माहिती

Leave a Reply