“प्रतिपश्चंद्र”
लेखक/#दिग्दर्शक- डॉ.प्रकाश कोयाडे
सुरुवात कुठून करावी तेच सुचत नाही . या कलाकृतीला पुस्तक म्हणायचं / कादंबरी म्हणायचं / की शब्दसंपदेतून अखंड वाहणारा रहस्यमय कथानकाचा अकल्पित असा झरा !
चार दिवसांत दोनवेळा कादंबरी पूर्ण वाचूनदेखील अजूनही अधाशासारखी स्थिती आहे.
जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट म्हणून नावाजलेल्या अगाथा ख्रिस्ती यांची आफ्टर द फ्युनरल किंवा ब्लॅक कॉफी या रहस्यमय कादंबर्यांना दहा वेळा फिकं पाडणारी किंवा पाणी पाजणारी आपली मराठी कादंबरी आहे प्रतिपश्चंद्र ! काय नाही या कलाकृतीत ? आजच्या जमान्यातून सुरुवात होऊन १४ व्या शतकातील विजयनगरच्या साम्राज्य मार्गे भारतवर्षाला नवदिशा देणाऱ्या शिवछत्रपती स्थापित मराठा स्वराज्यातील बेलाग निष्ठेची राष्ट्रगाथा काल्पनिक कथानकातून मांडणारी सर्वोत्कृष्ट रचना आहे प्रतिपश्चंद्र ! कथेतील नायकाच्या स्वप्नापासून सुरु झालेल्या प्रवासाला नायकाला ज्युनिअर असलेल्या मित्रासोबतच्या हलक्याफुलक्या संवादातून सुरुवात करुन वाचकाच्या वाचकबुद्धीची पकड घेत खिळवून ठेवतो. रायगडाच्या तोंडून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिव्यत्वाची प्रचिती येते. प्रशिक आणि नागनाथ स्वामी यांचा संवाद कथेच्या रहस्यमयतेची साक्ष देतो.कथेचा नायक रवीकुमार आणि मित्र आदित्य यांची अस्तिक नास्तिक चर्चा , घ्रूष्णेश्वराच्या मंदीराचं वर्णन कादंबरीतील ठिकाणांच्या वर्णनाची तोंड ओळख सांगतं. न्यायाधिश दीक्षित , रामचंद्रन, अजित कुमार यांच्या संवादाने कथेतील त्यांची एंट्री अजूनच रहस्यमय बनवते. कथेतील संवाद एवढे दमदार आहेत की आता पुढे काय ही उत्सुकता पहिल्या पानापासून वाचकांना खिळवून ठेवते. वेरूळ च्या लेण्यांचं जे वर्णन केलंय ते कदाचित कोरणार्या हातांनाही जमलं नसतं ! दीक्षित आणि रवीकुमारची भेट हीच मूळ रोमांचक प्रवासाला चावी देणारी घटना लेखकाने खूप चांगल्या पद्धतीने वर्णिलेली आहे. जेम्स बॉंडच्या गुन्हेउकल चित्रपटात देखील एवढी थरारकता अनुभवली नाही जेवढी रवीकुमार च्या प्रवासात अनुभवली . जसा माळेतील एकेक मणी माळेला मौल्यवान बनवतो तसेच या कलाकृतीमधील एकेक पात्र , त्यातील संवाद कथेला जीवंतपणा आणतात. प्रियलने मांडलेलं दशावतारांचं लॉजिक, स्वस्तिक चिन्हाची रचना यावरील लेखकाने मांडलेलं लॉजिक सारं काही अप्रतिम !
आयुष्य जगत असताना आपण जे काही शिकतो तेच जगण्यात अवलंबिले तर जगायला काय बहार येईल याचं सुत्र रवीकुमार प्रत्येक पावलानिशी उलगडतो . कटपायादीच्या माध्यमातून गणीत , वास्तूवर्णनातून भूगोल,भूमिती,विज्ञान तर रायगडाच्या मनोगतातून , प्रशिकच्या शब्दांमधून विजयनगरचा इतिहास , छत्रपती शिवरायांची निस्वार्थ भावना , खजिना संरक्षणासाठी महाराजांची आणि बहिर्जींची नियोजन रचना ,कार्यकर्तृत्वातून अमरगाथा लिहिणार्या शिवरायांच्या साथीदारांची ‘छत्रपती शिवरायांच्या विचारावर जीव ओवाळून टाकावा’ ही भावना मांडून लेखकाने काल्पनिक कथेत जिवंतपणा आणला आहे.
अष्ठकोनी राजमुद्रा , अष्ठप्रधानमंडळ अशा अनेक ऐतिहासिक सत्य घटकांची सांगड घालत लेखकाने कथेत जीव ओतला आहे. प्रत्येक पावलावर उत्सुकतेच्या धडाक्यातून मार्ग काढत वाचक निष्कर्षापर्यंत पोचणार म्हटलं की लेखकाने रहस्यमय रित्या वाचकाच्या अंदाजाला फोल ठरवत नवीन रहस्य निर्माण केलेलं आहे. शिवमंदीरांचं वर्णन त्यातून संस्कृती आणि अभ्यासाशी जोडलेली तार सारं काही अलौकिक बनवलं आहे लेखकाने. म्हणूनच हे फक्त पुस्तक किंवा कादंबरी न राहता सर्वोत्कृष्ट कलाकृती बनलेली आहे आणि त्याचे दिग्दर्शक आहेत डॉ.प्रकाश कोयाडे सर !
मराठीत रहस्यमय कादंबर्यांची अजिबात कमतरता नाही पण छत्रपती शिवाजी महाराज ,त्यांचा इतिहास, बहिर्जी नाईकांची एक नवी ओळख या सर्व बाबींना एका धाग्यात गुंफून प्रतिपश्चंद्र नावाचं मखमली सिंहासन लेखकाने विणलं आहे.
छत्रपती शिवराय आणि त्यांच्या विचारधारेने आजवर हजारो राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले आहेत त्याचप्रमाणे रहस्यमय साहित्य क्षेत्रात प्रतिपश्चंद्र ही कादंबरी जिवंत राष्ट्रीय चारित्र्य आहे.
शेवटी लेखकाचा अभिमान वाटतो माझ्या गावचा माझ्या शहराचा माझ्या मातीतला हिरा ज्याने ही सर्वोत्कृष्ट रचना करत आमच्या लातूरचं नाव अजून मोठं केलं यात अतिव आनंद आहे.
वाचकांना हे शब्दरुपी प्रतिपश्चंद्रेचं लेणं आपण दिलंत त्याबद्दल मनापासून आभार डॉ.प्रकाश कोयाडे सर !